औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांनंतर बॅकफूटवर गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे या पुन्हा सक्रीय झालेल्या दिसून आल्या. मराठवाड्याच्या सिंचन अनुशेषासह विकासाच्या मुद्यावर पंकजा मुंडेंनी आज औरंगाबादेत लाक्षणिक उपोषण केले. तसेच मराठवाड्याच्या मागण्यांसाठी पंकजा मुंडे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर मराठवाड्याचं पाणी थांबवाल तर खबरदार, आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे. मराठवाड्यातील दुष्काळमुक्ती तसंच येथील ठप्प योजना तातडीने सुरू करण्यात याव्यात यासाठी हे उपोषण झाले.
सरकारचं लक्ष वेधण्यासाठीचं पंकजा मुंडे यांनी हे लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर कोणतीही टीका केली नाही. तसेच उपोषणाला पाठींबा देणाऱ्या भाजप नेत्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.
'मराठवाड्यात पाण्याची वणवण संपवून समृद्धीची सत्ता स्थापना व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयास आहे!! उपोषण आक्षेपासाठी नाही अपेक्षांसाठी आहे. मागील, ५ वर्षे प्रयत्न झाले, पुढेही व्हावेत आणि होतील ही रास्त अपेक्षा आहे, आपण ही साथ दयावी', असं ट्विट त्यांनी केलं होतं.
पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर शिवसेनेने टीका केली आहे. मंत्री असतानाच पंकजा यांनी आवाज उठवला असता तर बरं झालं असतं असे टीकास्त्र शिवसेनेने सोडले आहे.