रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकेची सुमारे 50 लाखांची रोख ‘एटीएम’मध्ये न भरता परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. याप्रकरणी सी. एम. एस. इन्फो सिस्टम्स लि. या कंपनीच्या दोन कर्मचार्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हितेश नरसिंह पटेल (रा. पारिजात बंगला, विद्या हौसिंग सोसायटी, शिंदे मळा, सांगली) आणि अक्षयकुमार प्रदीप पाटील (आष्टा, ता. वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सांगलीतील चार आणि जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील एक अशा पाच एटीएममध्ये त्यांनी घोटाळा केला आहे.
29 जून ते 25 जुलै 2019 या एक महिन्याच्या कालावधीत दोघांनी एटीएमध्ये रक्कम न भरता ती हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीचे कोल्हापूरचे शाखाधिकारी शिवदत्त तुकाराम म्हांगोरे (रा. रंकाळा बस थांब्याजवळ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांत सांगलीत दुसर्यांदा एटीएम घोटाळा उघडकीस आला आहे.
स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांनी मुंबईतील सी.एम.एस.इन्फो सिस्टम्स या कंपनीला सांगली, मिरज आणि जयसिंगपूर परिसरातील 24 एटीएममध्ये पैसे भरण्याची एजन्सी दिली होती. कंपनीने हितेश पटेल आणि अक्षयकुमार पाटील या दोघांकडे 12 एटीएमची जबाबदारी सोपवली होती.
कंपनीतर्फे दरमहा एटीएमचे लेखापरीक्षण केले जाते. यामध्ये महिन्याभरात एटीएममध्ये किती रक्कम भरली? किती शिल्लक राहिली ? याचा आढावा घेतला जातो. तसा संबंधित बँकांनाही अहवाल सादर केला जातो. पटेल आणि पाटील यांच्याकडे जबाबदारी असलेल्या 12 एटीएमचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यावेळी सांगलीतील चार व जयसिंगपुरातील एक एटीएममध्ये त्यांनी 50 लाख 55 हजार रुपयांची रक्कम भरलीच नसल्याचे उघडकीस आले.
बँक ऑफ बडोदाच्या सांगलीतील आमराई रस्त्यावरील दोन एटीएम व स्टेट बँकेच्या झुलेलाल चौक, तसेच माधवनगर (ता. मिरज), जयसिंगपूर येथील तीन एटीएममध्ये संशयितांनी रक्कम न भरता घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने पटेल आणि पाटील यांच्याशी संपर्क साधला. मात्र ते मोबाईल बंद करुन पसार झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून कंपनीचे शाखाधिकारी म्हांगोरे दोघांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ते पुढे आलेच नाहीत. त्यामुळे म्हांगोरे यांनी फिर्याद दाखल केली. यातील पटेल हा या अपहाराचा ‘मास्टरमाईंड’ आहे. दोघांना पकडून त्यांच्याकडून रोकड जप्त करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.