संघर्षाला हवी साथ : शेतीत काम करत त्यानं मिळवलं यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सांगलीच्या तुषार कुंडलिक जावीर या विद्यार्थ्यानं दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तुषारला शेतात काम करावं लागतं... पुढच्या शिक्षणासाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...

Updated: Jul 5, 2017, 11:24 PM IST
संघर्षाला हवी साथ : शेतीत काम करत त्यानं मिळवलं यश title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सांगलीच्या तुषार कुंडलिक जावीर या विद्यार्थ्यानं दहावीच्या परीक्षेत ९३.४० टक्के गुण मिळवले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तुषारला शेतात काम करावं लागतं... पुढच्या शिक्षणासाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...

डोक्यावर वडिलांचं छत्र नाही... शिवणकाम करणारी आई... राहायला झोपडीचा आसरा... अशी सगळीच अवघड परिस्थिती... पण त्यावरही जिद्दीनं मात करत, यशाचा झेंडा फडकवला सांगली जिल्ह्यातल्या दिघंची गावच्या तुषार जावीरनं... तो लहान असतानाच वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या पाठी आई उषा जावीर यांनी कष्ट करून आपल्या तीन मुलांना शिकवलं. शिलाईकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. 

जावीर कुटुंबाला राहायला स्वतःचं घर नाही. पडक्या झोपडीत ते राहतात. पण आपल्या मुलानं खूप शिकावं, ही उषा जावीर यांची जिद्द... त्यांनी तुषारला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. मोडक्या संसारात काटकसर करून तुषारला शिकवलं. परिस्थिती हलाखीची असल्यानं तुषारनंही शेतात काम करून, शिक्षण घेतलं. त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. दहावीच्या परीक्षेत त्याला ९३.४० टक्के गुण मिळाले.

आटपाडी तालुक्यातील दिघंची हायस्कूलमध्ये तुषार शिकला. ना खासगी क्लास, ना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकं अशा परिस्थितीतही त्यानं दहावीला घवघवीत यश मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

शेतात घाम गाळून दहावीच्या परीक्षेत गुणांचं पीक काढणारा हा हुशार विद्यार्थी... आता गरज आहे ती त्याचं शिक्षणाचं स्वप्न साकारण्यासाठी आर्थिक मदत देण्याचं... तुम्ही तुषारला मदत करून त्याच्या स्वप्नांना खतपाणी घालाल...?

या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी तुम्हीही पुढे या.... त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या नावानंच चेक काढा... 

संपर्कासाठी :

झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड, मधू इंडस्ट्रीयल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई - ४०० ०१३

संपर्क : 022 - 24827821

ई-मेल : response.zeemedia@gmail.com