आर आर पाटील यांच्या रोहितचा विरोधकांना धोबीपछाड, म्हणतो आज आबांची खूप आठवण येते

'आबा असते तर खूश झाले असते' विरोधकांना धोबीपछाड दिल्यानंतर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया  

Updated: Jan 19, 2022, 02:26 PM IST
आर आर पाटील यांच्या रोहितचा विरोधकांना धोबीपछाड, म्हणतो आज आबांची खूप आठवण येते title=

Nagar Panchayat Election 2022 Result : राजकारणाच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पाटील यांनी दणक्यात एन्ट्री केली आहे. दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit Patil) यांनी सांगलीत कवठेमहंकाळ नगरपंचायत निवडणुकीत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result)  धुरळा उडवला आहे. 

रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 17 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या या दमदार विजयानंतर सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. 

सर्वसामान्य जनतेचा विजय
विजयानंतर बोलताना रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ मधील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, सर्व सामान्य जनतेच्या ताकदीवर विजय मिळवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीनंतर विरोधक शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य रोहित पाटील यांनी प्रचारावेळी केलं होतं, त्यावर बोलताना रोहित पाटील यांनी म्हटलंय, की माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. विकासकामं शिल्लक राहणार नाहीत असं आपल्याला म्हणायचं होतं, असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ज्येष्ठ नेत्यांचं आम्हाला मार्गदर्शन होतं, त्याच मार्गदर्शनाच्या जोरावर आम्ही निवडणुकी लढवली, आणि त्यामुळेच आम्ही यश मिळवलं, असं सांगत रोहित पाटील यांनी प्रत्येक वॉर्डातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडण्यासाठी प्रयत्न करु असं म्हटलं आहे. 'आबा गेले तेव्हा मी दहावीत होतो. फारसा सहवास लाभला नाही, पण आज ते असते तर खूश झाले असते,' अशी भावना यावेळी रोहित पाटील यांनी व्यक्त केली.

प्रचारादरम्यानचं भाषण गाजलं
रोहित पाटील यांनी निवडणुकीपूर्वी प्रचारसभेत केलेलं भाषण चांगलंच गाजलं होतं, निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर पाटील यांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. आता निवडणुकीनंतर त्यांनी आपले शब्द खरे करुन दाखवले आहेत.

रोहित पवार यांनी केलं अभिनंदन
रोहित पाटील यांच्या विजयावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अभिनंदन केलं आहे. आर आर पाटील यांच्या मातोश्री आणि रोहित पाटील यांच्या आजी भागिरथी पाटील यांनी विजयानंतर रोहित पाटील यांचं औक्षण केलं. हाच फोट ट्विट करत रोहित पवार यांनी शाब्बास रोहित... खूप खूप अभिनंदन अशा शुभेच्छा दिल्या आहेत.