कोल्हापूरवरुन प्रताप नाईकसह सांगलीहून सरफराज सनदी, झी मीडिया : सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक (Kavathe Mahankal Vidhansabha Election) यंदा लक्षवेधी ठरणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा खरंतर आर आर आबा पाटील (R R Patil) यांचा गड. सध्या आर आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाच्या आमदार आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित आर आर पाटील (Rohit Patil) हे मैदानात असणार आहेत. अगदी शरद पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी देखील जाहीर केलीय.
विरोधकांचं तगडं आव्हान
मात्र रोहित पाटील यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक वाटत तितकी सोपी राहणार नाही असं दिसतंय. आर आर पाटील यांच्याप्रमाणेच ज्युनिअर आर आर यांनाही राजकीय संघर्षाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत. कारण रोहित पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान असणार आहे लोकसभेतल्या पराभवानंतर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलंय.. मुलगा प्रभाकर याच्या उमेदवारीसाठी भाजपामधून ते आग्रही आहेत..
तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केलीय. घोरपडे हे सध्या कोणत्याही पक्षा सोबत नाहीत,त्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अजित घोरपडेंनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता त्यांच्या पाठिंबाची परतफेड म्हणून विशाल पाटलांनी अजित घोरपडेंच्या मागं ठामपणे उभं राहण्याचं स्पष्ट केलंय.
विरोधकांच्या संघर्षाला सामोरं जावं लागणार
आर आर आबा पाटील यांना त्यांच्या हयातीत पक्षातल्या संघर्षाबरोबर विरोधकांच्या संघर्षाला देखील सामोरे जावं लागलं. गेल्या वर्षी पार पडलेल्या कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत रोहित पाटलांना सर्व विरोधकांनी एकत्रित घेरण्याचा प्रयत्न केला. आता त्याच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीत देखील विरोधकांकडून रोहित पाटलांना चितपट करण्यासाठी डाव टाकायला सुरुवात झालीय. त्यामुळे आबांच्या वारसाची वाट खडतर आहे असंच चित्र दिसतंय.