सांगली : अभिनेता अल्लू अर्जुन याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'पुष्पा' या चित्रपटाची सद्या बरीच चर्चा सुरु आहे. चित्रपटातील डायलॉग म्हणू नका, किंवा मग त्यातील गाणी. सोशल मीडियावर रील्स सुरु केल्यावर 'पुष्पा'चीच हवा सगळीकडे पाहायला मिळते. (Pushpa)
सारं जग पुष्पाची नक्कल करत असतानाच आता महाराष्ट्रात थेट 'पुष्पा'चा प्रत्यक्ष थरारच पाहायला मिळाला आहे.
सांगलीत तब्बल अडीच कोटींचं रक्त चंदन मिरज पोलिसांनी जप्त केलं आहे.
तब्बल एक टन रक्त चंदनसाठा जप्त करून यासीन इनायत उल्ला खान याला पोलिसांनी अटक केली.
बंगळुरूहून कोल्हापूरला हे रक्त चंदन घेऊन जात होते, त्याचवेळी मिरज गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस दलानं केलेल्या या कारवाईत एक गाडी आणि रक्तचंदनसह अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यामुळं रक्त चंदन तस्करीचं आंतरराज्यीय रॅकेट असल्याचं उघडकीस आल्याचं म्हटलं जात आहे.
मुख्य म्हणजे चित्रपटामुळं काही काळ पडद्यामागे असणारी रक्तचंदनाची ही तस्करी आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ज्यामुळं या कारवाईनं साऱ्या देशाचं लक्ष वेधलं आहे.
सध्याच्या घडीला या तस्कराकडून आणखी कोणती माहिती समोर येते आणि हे रॅकेट कुठवर पसरलं आहे याचा सुगावा लागतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.