संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर वसुलीचा आरोप; कुणाच्या नावे किती केली वसुली?

किरीट सोमय्या यांनी कुणाच्या नवे वसुली केली याचे ट्रकभर पुरावे आपल्याकडे आहेत. त्यांची एकूण 222 प्रकरणे माझ्याकडे आहेत. हा एकूण साडेसात हजार कोटींचा घोटाळा आहे.  

Updated: Feb 17, 2022, 12:10 PM IST
संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांवर वसुलीचा आरोप; कुणाच्या नावे किती केली वसुली? title=

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुलुंडचा वसुलीखोर असे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी पवईतील पेरुबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय.
सोमय्या आणि त्याचा दोन एजंटांनी येथील 433 लोकांकडून प्रत्येकी 25 लाख रुपये घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 50 कोटी देणार असल्याचे त्यांनी या लोकांना सांगितलं होतं. फडणवीस यांच्या नावाने ही वसुली करण्यात आली.

सोमय्या याच्या या घोटाळ्याची सगळी कागदपत्रे ईडीकडे देणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना भेटून हा सगळा गैरव्यवहार उघडा पाडणार आहे. सोमय्या पुढे, लोकं मागे असं चित्रं लवकरच दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपचं सरकार होतं म्हणून लोक आतापर्यंत घाबरत होते. पण, कालपासून लोकांनी सोमय्याविरोधात एक एक प्रकरण आणायला सुरुवात केलीय. त्याच्या विरोधातली 222 प्रकरणे माझ्याकडे जमा झाली आहेत. त्यानं वसुली करून जवळपास साडे सात हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

सोमय्या याने फक्त फडणवीसच नव्हे तर भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या नावे वसुली केली आहे. अमित शहांच्या नावावरही सोमय्यानं पैसे गोळा केले. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आता बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.