मुंबई : छत्रपतींचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे ? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयनराजेंना चिमटा काढलाय. भाजपचे याविषयावर तोंड बंद आंदोलन सुरु असून संभाजी भिडेंकडून अद्याप सांगली, सातारा बंदची घोषणा झाली नसल्याचे देखील ते पुढे म्हणाले.
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नियमबाह्य, घटनाबाह्य आहे असं कधी वाटलंच नाही. सीमेवर लढताना सैनिक देखील हीच घोषणा देतात. त्यावरुन याची ताकद ओळखावी. कोणीही छत्रपतींच्या नावाने राजकारण करू नये. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणा दिल्या आहेत वैकय्या नायडूंनी जे केलं के सभागृहाला अनुसरून केलं आहे. वैंकय्या नायडू हे वरिष्ठ आहेत. हा वाद वाढवू नये असेही राऊत म्हणाले.
उदयनराजे माझ्यावर टीका करतात, त्यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. ते टीका करू शकतात, ते म्हणाले मी महान आहे. पण माझं मत आहे की छत्रपती महान आहेत आम्ही त्याचे मावळे आहोत.
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. यानंतर उदयनराजे भोसले कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असताना सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान या सगळ्या वादावर उदयनराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण नको, असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
'राज्यसभेच्या विरोधी बाकांवरुन इतर सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आला. राज्यघटनेमध्ये जी शपथ आहे तेवढीचं घ्यावी लागते. त्यापुढे काही म्हणता येत नाही. त्यावेळी सभापती व्यंकया नायडू यांनी इतर सदस्यांना थांबवत हे कोणाचं घर नाही, त्यामुळे रेकॉर्डवर केवळ घेतलेली शपथ जाईल आणि सर्व सदस्यांनी ज्या भाषेत शपथ घ्यायची आहे ती घ्या परंतु त्यापुढे काही जोडू नका, अशी विनंती केली. त्यांनी केवळ घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचं सांगितलं, महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो नसतो' असं उदयनराजे म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीच्या शपथवेळी दिलेल्या घोषणेवरुन आता मानापमानाचं राजकारण सुरु झालं आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी थेट सभापती व्यंकया नायडू यांच्यावर टीका केली आहे. तर काही नेत्यांनी भाजपला छत्रपती शिवाजी महाराज निवडणूकीपूरते हवे असल्याचं वक्तव्य केलं आहे. उदयनराजे यांच्या घोषणेवरुन वाद चिघळत असल्याचं दिसून येतंय.