पित्रं उपाशीच? सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांचा दुष्काळ

सर्वपित्री अमावस्येनिमित्त मृतात्मांच्या नावानं पिंडदान केलं जातं

Updated: Sep 29, 2019, 08:46 AM IST
पित्रं उपाशीच? सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांचा दुष्काळ  title=

योगेश खरे, झी २४ तास नाशिक : सर्वपित्री अमावस्येला पिंडदान करतात. पिंडाला कावळा शिवायलाच पाहिजे अशी धारणा आहे. असं असलं तरी सध्या पिंडाला शिवायला कावळाच येत नाही. कावळ्याचा दुष्काळ पडल्यानं नाशिकमध्ये पिंडदानासाठी आलेल्यांची चांगलीच अडचण झाली होती.

सर्वपित्री अमावस्येनिमित्त पिंडदान करण्यासाठी नाशिकच्या रामकुंडावर हजारोच्या संख्येनं लोकं येतात. रामकुंडावर मृतात्मांच्या नावानं पिंडदान केलं जातं. या पिंडाला कावळा शिवला तरच पिंडदानाचं काम पूर्ण झालं असं मानलं जातं. नाशिकमध्ये मात्र आज वेगळीच अडचण झाली. रामकुंडावर कावळ्यांसाठी जे पिंड ठेवण्यात आले होते. त्या पिंडांना शिवण्यासाठी कावळेच येत नव्हते. त्यामुळं पिंडदान केल्यानंतर लोकं बराचवेळ ताटकळत बसलेले पाहायला मिळाले.

कावळे कमी का झाले? याची कारणं अनेक आहेत. एरव्ही कावळे आपल्याला नकोसे वाटले तरी निसर्गाला त्यांची गरज आहे. निसर्गातल्या अन्नसाखळीत त्यांचं महत्त्वाचं स्थान आहे. एरव्ही कावळे कमी असले किंवा नसले याचा फरक पडत नसला तरी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कावळ्याच्या दुष्काळामुळे बऱ्याच जणांचा खोळंबा मात्र झाला.