कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्याला मारहाण झाल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. आधार कार्ड आणले नाही म्हणून शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या पायाचे ऑपेरेशन करायला लागल्याचा आरोप पालकांनी केलाय. तर शाळेने हे आरोप फेटाळलेत.. त्यामुळे नेमके झालंय काय असा प्रश्न उपस्थित झालाय.
सलाईन लावलेला आणि घरात पडून असलेला हा आहे श्रीकांत बेळळे... चिंचवडच्या नामांकित एमएसएस म्हणजेच माटे शाळेचा पाचवीचा विद्यार्थी... नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे ही शस्त्रक्रिया करावी लागत असल्याचा आरोप श्रीकांतच्या पालकांनी केलाय...
श्रीकांतला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आधार कार्ड आणायला सांगण्यात आले होते. पण ते तो घेऊन गेला नाही त्यामुळे त्याचे वर्गशिक्षक किशोर खरात यांनी त्याच्या पायावर छडीने मारले आणि त्यामुळं त्याच्या पायात गुडघ्याच्या मागच्या बाजूला सूज आली, पाणी झालं आणि अखेर त्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याचं पालकांनी म्हटलंय.
स्वत: श्रीकांतही आधारकार्ड नसल्यामुळे शिक्षकाने मारल्याचे सांगतोय. दुसरीकडं शाळेने मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. मात्र चौकशीत शिक्षक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करू असं ही शाळेतर्फे सांगण्यात येतंय.
या घटनेनं शहरात एकच खळबळ उडालीय. पण शाळा आणि पालक यांनी एकमेकांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे नेमकं खरं कोण याची उत्सुकता वाढलीय.