17 year old ends life for IPhone: कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या (Kalyan Railway Staion) एका झाडावर 17 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्री स्थानिकांना हा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना यासंदर्भात कळवण्यात आलं. पोलिसांनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. या मुलाने आयफोन घेण्यासाठी आपल्या वडिलांनी कष्टाने कमवलेले 1 लाख रुपये खर्च केल्याने मिळालेल्या ओरड्यानंतर निराश होऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
झाडाला गळफास घेतलेल्या या मुलाच्या खिशात 2 फोन सापडले. यापैकी एक आयफोन 14 होता तर दुसरा रेडमीचा फोन होता. पोलिस तपास करत असतानाच यापैकी एक फोन वाजला. पोलिसांनी फोन उचलला असता हा फोन उत्तर प्रदेशमधील मुलाचे नातेवाईकांचा असल्याचं स्पष्ट झालं. गाझियाबादमधील हे नातेवाईक बऱ्याच वेळापासून या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते असं त्यांनी पोलिसांना सांगितल्याची माहिती, महात्मा फुले पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांनी दिली.
पोलिसांनी या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीमध्ये हा मुलगा त्याचे पालक आणि 2 बहिणींबरोबर राहत होता. नुकताच हा मुलगा 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला. त्याला 12 वीमध्ये 48 टक्के मार्क मिळाले होते. शिक्षणासंदर्भात पुढे काय करता येईल याबद्दलची चाचपणी करण्यासाठी मीरा रोडमधील त्याच्या चुलत्याच्या घरी आला होता. मागील एका आठवड्यापासून तो मीरा रोडमध्ये वास्तव्यास होता. या मुलाच्या वडिलांनी घरातील कपाटामध्ये 1 लाख रुपयांची रोख रक्कम ठेवली होती. 2 दिवसांपूर्वीच हे पैसे घरात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी यासंदर्भात चौकशीसाठी मुलाला फोन केला असता त्याने हे पैसे घेतल्याची कबुली दिली. तसेच या पैशांमधून आपण आयफोन घेतल्याची कबुलीही या तरुणाने वडिलांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
"वडिलांनी या मुलाला दम दिला. फार कष्टाने कमवलेले हे पैसे तुझ्या बहिणींच्या लग्नासाठी खर्च करायला जमवले होते, असं त्यांनी मुलाला दम देताना सांगितलं. ओरडा मिळाल्याने नाराज झालेला हा मुलगा कोणालाही काहीही न सांगता सोमवारी आपल्या चुलत्याचं घर सोडून निघाला," असंही पोलिसांनी घडलेल्या घटनाक्रमासंदर्भात माहिती देताना सांगितलं.
स्थानिकांनी या मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पत्री पुलाजवळ रात्री 9 च्या सुमारास या मुलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत स्थानिकांना पहिल्यांदा दिसला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. "आम्ही या मृत मुलाच्या खिशांची झडती घेतली असता एक ओळखपत्र आणि 2 मोबाईल फोन आम्हाला सापडले. यापैकी एक आयफोन 14 होता. आम्ही त्याला रखुमाई रुग्णालयात घेऊन गेलो पण त्याला दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं," अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामध्ये महात्मा फुले पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर या मुलाचा मृतदेह नातेवाईकांना सोपवला जाईल असंही पोलिसांनी सांगितलं.