शिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरे यांचा पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा

Shiv Sena Crisis : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  बैठकांचा सपाटा लावला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत  पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. 

Updated: Jul 12, 2022, 03:19 PM IST
शिवसेना आक्रमक, उद्धव ठाकरे यांचा पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा  title=

मुंबई : Shiv Sena Crisis : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागले. त्यानंतर आता 15 आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत  पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. 

आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला 30 ते 35 माजी आमदार हे उपस्थित होते. माजी आमदारांना तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे. आता आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीत दिले. 

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरु आहे. शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे मुंबईत 'निष्ठा' दौरा करत आहेत. पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याचा धडाका आदित्य ठाकरे यांनी सुरु केला केलाय. याला प्रतिसाद मिळत आहे. तसेच जुने कार्यकर्तेही सक्रीय झाल्याने शिवसेनेत चैतन्य दिसून येत आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आतापासून 2024 निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.  त्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली आहे. माजी आमदार शिंदे गटात जाऊ, नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे माजी आमदारांशी संवाद साधल्यानंतर 'एकला चलो रे'चा नारा देण्यात आला आहे. 

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये NDA च्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केले आहे. यापूर्वी सुद्धा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी UPA च्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता.