अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितल्याप्रमाणे आज अलिबागमधल्या (Alibaug) कोर्लई (Korlai) गावाला भेट दिली. अलिबागच्या कोर्लई गावात पोहचल्यानंतर तिथे हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. किरीट सोमय्या पोहचण्याआधी तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते.
किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचातच त्यांच्याबरोबर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष सुरु केला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुकीही झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.
तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन आधीच पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या हातातले झेंडे काढून घेतले.
ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. त्यानतंर ते संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचयातीत काही कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर किरीट सोमय्या ग्रामपंचायतीतून निघून गेले. किरीट सोमय्या ग्रामपंचायतीतून गेल्यानंतर शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीत गोमु्त्र शिंपडलं. त्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.
कोर्लई गावाचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार किरीट सोमय्या हे कोणतेही कागदपत्र इथून घेऊन गेलेले नाहीत. याआधीही सोमय्या चारवेळा कोर्लई गावात येऊन गेले होते. त्यावेळीही त्यांना सर्व माहिती दिली होती. आताही त्यांनी भेट द्यायची आहे असं पत्र पाठवलं होतं, त्यांना कोणतीही माहिती घ्यायची नव्हती तर केवळ स्टंटबाजी करायची होती, असा आरोप सरपंच प्रशांत मिसाळ यांनी केला आहे.