युतीचा नवा पॅटर्न ! महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आली एकत्र

राष्ट्रवादी आणि शिवसेना आली आणखी जवळ

Updated: Jun 22, 2021, 09:09 PM IST
युतीचा नवा पॅटर्न ! महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आली एकत्र

दीपक भातुसे, मुंबई : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी (Shivsena-NCP) युतीचा चर्चा सुरु असताना आता ही चर्चा प्रत्यक्षात उतरली आहे. मुंबई महापालिका ( BMC Election ) निवडणुकीआधी अहमदनगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी याबाबत बैठक पार पडली. 

या बैठकीला नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे स्थानिक नेते तसंच दोन्ही पक्षांचे काही नगरसेवक उपस्थित होते.  अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.

एकीकडे मुंबई महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु असताना आता अहमदनगरमध्ये त्याची पहिली झलक पाहायला मिळाली. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी राष्ट्रवादीकडून मात्र शिवसेनेसोबत युती करण्याचा मानस दिसतो आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. पण त्यासाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. भाजपने देखील स्वबळाचा नारा दिला आहे. पण असं असलं तरी राजकारणात कधी काय होईल. हे सांगता येत नाही.