मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनातून पुन्हा एकदा भाजपवर कडाडून टीका करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे उघड झाल्याचा टोला सामनातून लगावण्यात आल आहे. महाराष्ट्राचे आपण मालक आणि देशाचे बाप आहोत अशा मानसिकतेतून आता बाहेर यावे. ही मानसिकता १०५ वाल्यांच्या मानसिकतेस धोकादायक आहे. ही स्थिती अशीच सुरु राहील्यास वेडेपणा येऊ शकतो आणि यातून पंतप्रधान मोदी यांचेच नाव खराब होत असल्याचे 'सामना'तून म्हटले आहे.
१०५ आमदार वाल्यांनी आम्ही सरकार देऊ शकत नाही असे आधीच राज्यपालांसमोर स्पष्ट केले. पण आता राष्ट्रपती राजवट लागू होताच आमचेच सरकार येणार हे कोणत्या तोंडाने बोलत आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला. स्वच्छ, पारदर्शी कारभार करणाऱ्यांचा खोटेपण उघड झाल्याची टीका भाजपावर करण्यात आली आहेत.
'पुन्हा आमचेच सरकार येईल !' या किंकाळ्यांनी जनतेचे कान बधिर होत आहेत. अशा किंकाळ्या करणाऱ्यांचेही मानसिक संतुलन बिघडू शकते. यामुळे वेड्यांच्या संख्येत भर पडल्यास ते महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेस शोभणार नसल्याचा चिमटा भाजप सरकारला काढण्यात आला आहे. आता भाजप नेते पत्रकार परिषद घेऊन या सर्वाला काय प्रत्युत्तर देणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.