खड्डयांवरून शिवसेना खासदार आणि मनसे आमदारांमध्ये जुंपली

खड्डयांची समस्या दरवर्षीप्रमाणे यंदा ही चव्हाटयावर

Updated: Aug 26, 2020, 09:19 PM IST
खड्डयांवरून शिवसेना खासदार आणि मनसे आमदारांमध्ये जुंपली title=

आतिष भोईर, कल्याण : नेमिची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे पावसाळा आणि शहरातील रस्त्यावरील खड्डे नेहमीचेच समीकरण बनले आहे. डोंबिवली आणि कल्याण शहरातील रस्त्यावरील खड्डयांची समस्या दरवर्षीप्रमाणे यंदा ही चांगलीच चव्हाटयावर आली आहे. आता खड्डयांवरून शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं होतं, यावरून शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी "आमदारांनी ट्विटरच्या बाहेर पडून सहज मतदारसंघात फेरफटका मारावा, खड्डेभरणीची कामं कुठे सुरू आहेत ते समजेल" असा टोला लगावला आहे. मात्र या टोल्यानंतर आमदार पाटील यांनी चक्क खासदार शिंदे यांच्या डोंबिवलीतील बंगल्यासमोरील रस्त्यांची र्दुदशा आणि खड्डयांची पाहणी केला आहे. त्यामुळे खड्डयावरून शिंदे विरूध्द पाटील यांच्यात सामना रंगण्याचे दिसून येत आहे.