योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हाॅटेलमध्ये उच्च शिक्षित वधु -वराचा विवाह सोहळा आज सायंकाळी पार पडला. जात पंचायतच्या पंचांकडून डॉक्टर असलेल्या नववधूची लग्नानंतर कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबचा तक्रार अर्ज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस प्राप्त झाला होता.
त्यानुसार अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात विनंती अर्ज दिला होता. अशी कुप्रथा थांबविण्याची विनंती करण्यात आली होती. त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांनी सदर हाॅटेल मालकाला नोटीस बजावली. काही अनुचित प्रकार झाल्यास हॉटेल मालकाला जबाबदार ठरविण्यात येईल असे नोटीसमधून कळविले होते.
त्या नंतर आज सायंकाळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे आपल्या सहकाऱ्यांसोबक विवाह स्थळी दाखल झाले.अशी कौमार्य चाचणी चाचणीबाबत त्यांनी शहानिशा करून, संबंधितांचे जबाब घेतल्याचे समजते. अशी काही परीक्षा होत नाही, असे त्यांचे म्हणणे असेल्याचे समजते. जात पंचायतींच्या पंचांनी कानावर हात ठेवून अशी कौमार्य चाचणी होत नसल्याचे सांगितले. पोलीसांनी कायद्याची जाणीव करून दिल्यावर अशी कौमार्य परीक्षा होत नसल्याचे व करणार नसल्याचे लेखी लिहून दिल्याचेही समजते.
मात्र सदर समाजातील अनेक बांधवांच्या अशा तक्रारी आहेत. जातपंचायतीच्या दबावाखाली ते असल्याने समोर येत नाहीत. मात्र महाराष्ट्र अंनिस अशा पिडींतांना पुन्हा आवाहन करून, हा प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न करणार आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी आज क्रूर प्रथेविरुद्ध समाजात पुन्हा प्रबोधन,जनजागृती साठी प्रयत्न केले आहे. पोलिसांचेही सहकार्य लाभले आहे. संघटनेच्या वतीने पोलिसांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
पोलीसांनी या प्रकारात व्यवस्थित लक्ष घालावे यासाठी विधानसभेच्या उप सभापती नीलम गोर्हे यांनी कृतीशील हस्तक्षेप केला होता. व पोलिसांना सुचना केल्या होत्या.या मोहिमेत डाॅ.टी .आर .गोराणे,कृष्णा चांदगुडे, वकील समीर शिंदे,नितीन बागुल,महेंद्र दातरंगे कृष्णा इंद्रीकर, संजय हराळे, दिलीप काळे आदी कार्यकर्ते सामिल झाले होते. हा अंनिसच्या जात पंचायत विरोधी लढ्याचा विजय असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आजही एका समाजात लग्नानंतर वधूची कौमार्य परीक्षा घेतली जाते. जातपंचांनी दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर वर व वधू यांनी झोपायचे असते. त्यावर रक्ताचा लाल डाग पडला तरच, ते लग्न ग्राह्य धरले जाते. अन्यथा ते लग्न अमान्य करून, अशा वधूस मारहाण करून, तिच्या पालकांना शिक्षा व जबर आर्थिक दंड केला जातो. दंडाची रक्कम न भरल्यास तिच्या परिवाराला वाळीत टाकले जाते. राज्य सरकार कडून अशा कुप्रथा थांबविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतू परंपरेच्या नावाखाली स्त्रीच्या चारित्र्यावर गदा येत आहे व मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे.