Shocking Visuals Nashik Bus Accident: नाशिकमधील सापुतारा घाटातील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटामध्ये रविवारी एक बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचा हादरवून टाकणारा घटनाक्रम कॅमेरामध्ये कैद झाला आहे. खरं तर सापुतारा घाट मार्ग दिवसेंदिवस अधिक खडतर होत असून पावसामुळे येथील निसरड्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. असाच एक अपघात रविवारी (7 जुलै 2024 रोजी) झाला. प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस दरीत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झाला असून एकूण 58 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचा नेमका क्षण बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.
अपघातग्रस्त बस ही गुजरातमधील सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती समोर येत आहे. ही लक्झरी बस 60 प्रवाशांना घेऊन परत जात असताना हा अपघात झाला. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याचं दिसून येत आहे. सुरतमधील चौक बाजार-उधना येथील प्रवाशांना घेऊन जाणारी बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक जीजे 05 बी. टी. 9393 ही बस रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. सायंकाळी सहाच्या सुमारास घाटात एक अवघड वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली.
व्हिडीओमध्ये अवघड वळणावरुन बस वळालीच नाही आणि थेट संरक्षण भिंत तोडून दरीत कोससळ्याचं व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ही लक्झरी बस खोल दरीत कोसळल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आरडाओरड ऐकू येत आहे.
ही बस दरीत कोसळल्यानंतर लोक मदतीसाठी धावले. सुदैवाने ही बस संपूर्णपणे दरीत न कोसळता उतारावरील एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि अधिक प्रमाणात जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात 8 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, 108 चे पथकही घटनास्थळी पोचलं होतं. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलवलण्यात आलं. या अपघातात दोन चिमुकल्यांनी प्राण गमावला आहे. या अपघातप्रकरणाची सध्या पोलीस चौकशी करत आहे. मात्र या दुर्घटनेचा नव्याने समोर आलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकल्याचं पाहायला मिळत आहे.