आंगणेवाडी जत्रेसाठी पार पडली पारध, गाड्यांच्या बुकींगची लगबग सुरू

दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठत हा यात्रोत्सव पार पडतो

Updated: Dec 8, 2019, 12:32 PM IST
आंगणेवाडी जत्रेसाठी पार पडली पारध, गाड्यांच्या बुकींगची लगबग सुरू  title=
फाईल फोटो

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गातल्या मालवणमधल्या आंगणेवाडी यात्रेला सोमवार १७ फेब्रुवारी २०२० ला सुरुवात होणार आहे. शनिवारी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आल्यानंतर जत्रोत्सवाची तारीख जाहीर केली गेली. त्यामुळे बाहेरगावी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने असलेल्या भाविकांमध्ये आता तिकीट बुकिंगची लगबग सुरू झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात यावर्षी भाविकांची गर्दी अधिक वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

यंदाच्या वर्षी २५ फेब्रुवारी २०१९ पासून दोन दिवस हा उत्सव पार पडला होता. दरवर्षी या जत्रेसाठी लाखोंच्या संख्येनं भाविक इथं दाखल होतात. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठत हा यात्रोत्सव पार पडतो. या उत्सवासाठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वेही सोडण्यात येतात. परंतु, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचंही तिकीट लगेचच बूक होऊन जातात. त्यामुळे तुम्हीही आंगणेवाडीच्या जत्रेला जायचा बेत आखत असाल तर त्याची तजबीज तुम्हाला आत्ताच करावी लागणार, हे निश्चित.