नवी मुंबई : कांद्याने सध्या सगळ्यांचेच वांदे केले असताना काही राजकीय नेत्यांनी यातही संधी साधली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक येत्या चार महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, मतदारांना खूष करण्यासाठी, सध्या अव्वाच्या सव्वा भाव खाणारा कांदा नवी मुंबईतील मतदारांना चक्क अर्ध्या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे. १०० रुपयांचा कांदा ५० रुपये किलो ने मिळत असल्याने, निश्चिच गृहिणी यावर खूष आहेत.
अर्ध्या भावात कांदा मिळत असल्याने झुंबड उडाली होती. अनेक आजी माजी इच्छुक उमेदवारांनी कांद्याचा आसरा घेत मतदारांना खूष करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अर्थातच हे कांदे फक्त त्यांच्याच मतदारसंघातील मतदारांना मिळतायत. वाशी सेक्टर - ९ आणि १० मधील मतदारांना या अर्ध्या किंमतीच्या कांदा खरेदीचा आनंद लुटला आहे.
कांदा सध्या चांगलाच भाव खात आहे. पण हाच रडणवारा कांदा निवडणुकीच्या आधी उमेदवारांसाठी आसरा बनला आहे. सध्या देशभरात कांदा महागल्याने नागरिकांच्या ताटातून कांदा गाय़ब झाला आहे. आपल्या उमेदवारांना खूश करण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. कांदा हा सध्या सोशल मीडियापासून ट्रेन आणि गल्लीपासून संसदेपर्यंत चर्चेत आहे.
अहमदनगरमध्ये कांद्याला आज विक्रमी भाव मिळाला आहे. २०० रुपये किलोने कांदा विकला गेल्यामुळे शेतकरी लखपती झाला आहे. पण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने त्यांची मात्र निराशा झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाने कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे. तर पाऊस लांबल्याने कांदा लावण्याला देखील उशीर झाला आहे. त्यामुळे नवीन कांदा येईपर्यंत कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे.