...ही आहे भारतातली आंतरराष्ट्रीय स्तरावरची एकमेव बास्केटबॉल रेफ्री!

कुस्तीपटू घडवणाऱ्या कोल्हापूरात स्नेहल बेंडके ही आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल रेफ्री तयार झालीय. 

Updated: Sep 8, 2017, 10:16 PM IST
...ही आहे भारतातली आंतरराष्ट्रीय स्तरावरची एकमेव बास्केटबॉल रेफ्री! title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कुस्तीपटू घडवणाऱ्या कोल्हापूरात स्नेहल बेंडके ही आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल रेफ्री तयार झालीय. 

इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन अर्थात 'फिबा' या संस्थेची परीक्षा उतीर्ण झालेली स्नेहल २००९ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल रेफ्री म्हणून काम करतेय... अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला आहे. 

स्नेहलन २००० मध्ये बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली. २००३ ते २००६ या काळात तिनं शिवाजी विद्यापीठाकडून अनेक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलं. या दरम्यान तिला अनेक स्पर्धामध्ये महिला बॉस्केटबॉल रेफ्री नसल्याचं दिसलं. त्यामुळे स्नेहलनं बास्केटबॉल रेफ्री होण्याचा निर्णय घेतला आणि २००५ मध्ये ती राज्य स्तरावरची रेफ्री परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर  २००६ मध्ये ती आंतरराष्ट्रीय रेफ्री परीक्षा उत्तीर्ण झाली. 

२००९ मध्ये चेन्नईत झालेल्या आशियाई महिला बास्केटबॉल स्पर्धेत तिन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेफ्री म्हणून पदार्पण केलं. २०१२ मध्ये स्नेहलची निवड ऑलिंपिक स्पर्धेच्या सेमीफायनल स्पर्धेसाठी झाली. लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली स्नेहल एकमेव महिला रेफ्री होती. त्यानंतर महिलांच्या स्पर्धांबरोबर पुरुषांच्या स्पर्धेसाठीही तिच नेमणूक होऊ लागली. 

आशिया खंडात जवळपास ५० महिला रेफ्री आहेत. पण त्यातून चीनमधील चॅम्पियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्नेहलची नियुक्ती झाली. अशा प्रकारची कामगीरी करणारी स्नेहल ही आशियातील एकमेव रेफ्री होती. आंतराष्ट्रीय रेफ्री म्हणून कामगिरी करण्यासाठी स्नेहलला खूप मेहनत घ्यावी लागली. ऑलिम्पिकसाठी ऱेफ्री म्हणून निवड होण्यासाठी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि गेल्या काही स्पर्धांतल्या कामगिरीचा विचार केला जातो. या तीनही आघाड्यांवर ती सरस ठरली त्यामुळं तिची रेफ्री म्हणून निवड झाली.

ज्या बास्केटबॉल खेळात फक्त रेफ्री म्हणून पुरुषांची मक्तेदारी होती. तिथं स्नेहलनं आपलं आणि पर्यायानं भारताचं नाव उज्वल केलंय. यासाठी तिला कोल्हापूरकरांचं मोठं पाठबळ मिळालंय. कोल्हापूर शहररातून जी ऊर्जा मिळते त्या उर्जेवरच आपण इथंपर्यत मजल मारली अल्याचं स्नेहल सांगते. 

स्नेहलनं निवडलेलं फिल्ड हे नवीन आहे. बॉस्केटबॉल प्लेअर होण्याचं स्वप्न तर अनेक जण पहातात. पण स्नेहल बेंडकेनं निवडलेलं रेफ्री फिल्ड अनेकांना प्रेरणा देणारं आहे.