सोलापुरातील तरुणांनी अर्ध्या एकर शेतात साकारला हरित गणेश

अर्ध्या एकर शेतात या तरुणांनी गणपतीची हरित प्रतिमा साकारली

Updated: Aug 17, 2020, 09:03 PM IST

अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरातील बाळे परिसरातील तरुणांनी गणरायाची अनोखी अशी प्रतीमा साकारली आहे. जवळपास अर्ध्या एकर शेतात या तरुणांनी गणपतीची हरित प्रतिमा साकारली आहे. गवत, अळीव आणि गहू इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. प्रतीक हणमंत तांदळे असे या गणरायाची प्रतिमा साकारणाऱ्या तरुणाचे नाव आहे. 

त्याच्यासोबत त्याचे मित्र अभिजय गायकवाड, राघव शिंदे, बॉबी तोडकरी, अजय बामनकर, वैभव कोळी, ओंकार राजुरे, बालाजी अंबुरे हे देखील या कामात सहभागी होते. जवळपास दीड महिना प्रतिमा साकारण्यासाठी वेळ लागला. लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने हे सगळे घरात बसूनच होते. 

गणेशोत्सव तोंडावर असताना कोरोनाचं संकट असल्याने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. म्हणून अशा अनोख्या पध्दतीने गणरायाची प्रतिमा साकारण्यात आल्याचे प्रतिक तांदळे यांनी 'झी २४ तास' ला सांगितले.