दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार, इतक्या टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

ST passenger fares increase : देशात महागाईचा उच्चांक नोंदवला गेला आहे. आता दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार असे संकेत मिळत आहेत.  

Updated: Oct 23, 2021, 01:12 PM IST
दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार, इतक्या टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
संग्रहित छाया

मुंबई : ST passenger fares increase : देशात महागाईचा उच्चांक नोंदवला गेला आहे. पेट्रोल आणि डिझेल, सीएनजी आणि पीएनजी गॅस दरवाढीनंतर आता एक एक गोष्टींसह सर्वच महाग होत चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. नागरिक महागाईच्या बोझ्याखाली दबत चालला आहे. आता दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागणार असे संकेत मिळत आहेत. कारण एसटी भाडेवाढीचा (ST fares) प्रस्ताव राज्य सरकराला पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

दिवाळीच्या तोंडावर एसटी भाडेवाढ करण्याच्या तयारीत असून 17 टक्के भाडेवाढीचा एसटी महामंडळाचा सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होत आहे. तो भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एसटीच्या भाडेवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे.