Ahmednagar ST Bus Accident : एसटी बस चालवतानाच ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला. अहमदनगरच्या पारनेर बस स्थानकाबाहेरची ही घटना आहे. अशोक भापकर असं या चालकाचं नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं ते स्टेअरींग व्हीलवरच पडल्यानं बस अनियंत्रित झाली. मात्र प्रवासी आणि नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
अशोक भापकर यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पारनेर बस स्थानकातून ही बस बाहेर पडताच भापकर यांना झटके येऊ लागले ते स्टेरिंग वर पडले आणि त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले. बाजूलाच असलेले उदय औटी, राजू खोसे, राहुल काळे, अनिल ठोंबरे, विनायक कानडे, नितीन चेडे या दुकानदारांनी बसकडे धाव घेत केबिन मध्ये चढून बस नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान या बस चालकाला पारनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनसमोर बेस्ट बसला अपघात झाला होता. बसंत पार्क इथं ही दुर्घटना घडली. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा बसवरील ताबा सुटला. त्यानंतर बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानांना चिरडत सिग्नलला धडकली. बस क्रमांक 381 ला हा अपघात झाला होता.
गोंदिया आगाराची एसटी बस चक्क तीन चाकावर धावलीय. धावत्या बसचं एक चाक निखळल्यानं बस काही अंतरापर्यंत तीन चाकावरच धावली. ही बस तुमसरवरून गोंदियाकडं जात होती. गंगाझरी आणि डोंगरगाव दरम्यान, बसच्या समोरील टायर निघाले आणि बाजूच्या शेतात गेले. बसमधून 16 प्रवासी प्रवास करीत होते. यावेळी काही प्रवाशी किरकोळ जखमी झालेयत. ड्रायव्हरनं प्रसंगावधान ओळखत मोठ्या शिताफीनं बस थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांची सुखरुप सुटका झाली.
तरुणांनी एसटी बस ड्रायव्हर आणि एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये घडली होती. साबुर्डीवरुन राजगुरुनगरला जाणा-या एसटीबसमध्ये हा प्रकार घडला होता. प्रावसादरम्यान कडूस गावात अज्ञात दुचाकीस्वार तरुणांकडून बसचालकाला दमदाटी करत मारहाण केली. रस्त्यावरच हा संपूर्ण राडा सुरू होता. बस चालक आणि प्रवासी महिला गंभीर जखमी झाले होते.