आषाढीत 'एस.टी'ला पावला विठ्ठल, उत्पन्नात 38 टक्क्यांची वाढ

ST Income Incresed: राज्य शासनाने दिलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा मागिल वर्षाच्या तुलनेत 7 कोटी 69 लाख रुपये उत्पन्न अधिक मिळाले

Pravin Dabholkar | Updated: Jul 7, 2023, 05:45 PM IST
आषाढीत 'एस.टी'ला पावला विठ्ठल, उत्पन्नात 38 टक्क्यांची वाढ  title=

ST Income Incresed: दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविक पंढरपूरला जातात. विठ्ठलाची आपल्यावर कृपा असते,अशी यामागची त्यांची श्रद्धा असते. हाक मारणाऱ्या भाविकांना विठ्ठल पावतो तशी एसटी महामंडळावरही विठ्ठलाची कृपा पाहायला मिळत आहे. एसटी तोट्यात चाललीय असे म्हटले जात असताना फक्त आषाढीत विठ्ठल भक्तांनी केलेल्या प्रवासामुळे एसटी महामंडळ फायद्यात आले आहे. 

यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळातर्फे 25 जून ते 5 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 17 हजार 566 फेऱ्यांमधून 8 लाख 81 हजार 665 प्रवाशांनी प्रवास केला. यातून एसटीला 27 कोटी 88 लाख रुपये इतके उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. 5 हजार बसेस वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया 4 तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या. त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगण सोहळयासाठी एसटीकडून 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 

राज्य शासनाने दिलेल्या 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी तिकिट दरात 50 टक्के सवलत या दोन योजनांमुळे यंदा मागिल वर्षाच्या तुलनेत 7 कोटी 69 लाख रुपये उत्पन्न अधिक मिळाले तर प्रवाशी संख्या 2 लाख 45 हजार 670 ने वाढली. 

'प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल !' असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे.