मोबाईलद्वारे जाणून घ्या बोअरवेलमधील भुजल पातळी; पुण्यातील स्टार्टअप कंपनीने आणलं खास अ‍ॅप

Bhujal App : बोअरवेलमधील भूजल पातळीचा अभ्यास करण्याच्या उद्देषातून हे भुजल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हा उपक्रम गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, पुणे महानगरपालिका आणि वॉटरलॅब नावाच्या पुणेस्थित स्टार्टअपने सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 10, 2023, 05:16 PM IST
मोबाईलद्वारे जाणून घ्या बोअरवेलमधील भुजल पातळी; पुण्यातील स्टार्टअप कंपनीने आणलं खास अ‍ॅप title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

Bhujal App : देशात बोअरवेलच्या (borewells) माध्यमातून शेती आणि इतर अनेक महत्त्वाची कामे केली जातात. मात्र सतत पाणी उपसल्याने बोअरवेलमधील पाण्याच्या पातळीचे अचूक मूल्यांकन करणे कठीण होते. ही माहिती उपलब्ध नसल्याने अनेकदा बोअरवेल कोरडे होईपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी उपसले जाते. मात्र यामुळे पाण्याच्या पातळीचे (groundwater) व्यवस्थापन बिघडतं. त्यामुळे आता पुण्यातील एका कंपनीने खास अ‍ॅप तयार केले आहे. वॉटरलॅब्स सोल्युशन (WaterLabs Solution) नावाच्या पुणेस्थित कंपनीने 'भुजल' नावाचे (Bhujal App) भुजल पातळीबाबत माहिती देण्यारे अ‍ॅप आणले आहे. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिकृतपणे त्याला मान्यता दिली आहे. हे अ‍ॅप कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करता भूजल पातळीचे परीक्षण करु शकते.

विजय गावडे यांच्या नेतृत्वाखालील वॉटरलॅब्स सोल्युशनच्या टीमने अँड्रॉइड युजर्ससाठी हे भूजल पातळीबाबत माहिती देणारे खास अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपचे पेटंट देखील वॉटरलॅब्स कंपनीने घेतलं आहे. या अ‍ॅपद्वारे बोअरवेलमधील पाण्याच्या पातळीचा मागोवा घेण्यासाठी एक सोपा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे विजय गावडे यांनी सांगितले.

भुजल अ‍ॅप हे वापरण्यासाठी सहज आणि सोपे आहे. तसेच हे एक बहुभाषिक अ‍ॅप आहे जे सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते आणि वापरले जाऊ शकते. एका मिनिटापेक्षा कमी वेळात भुजल अ‍ॅप बोअरवेलमधील पाण्याची पातळी अचूकपणे सांगू शकते. शेतकरी, एखादी संस्था, व्यवसाय आणि उद्योगांसाठी बोअरवेल वापरणाऱ्यांसाठी भुजल अ‍ॅप हे अत्यंत उपयोगी असल्याचेही निर्मात्यांनी म्हटलं आहे. भुजल अ‍ॅपची अचूकता आणि विश्वासार्हता ही कोझिकोडमधील सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, आयआयटी मुंबई आणि स्टेट ग्राउंड एजन्सी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांद्वारे तपासली गेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात याचा वापर देखील करण्यात आला आहे.
 
महत्त्वाची बाब म्हणजे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने भुजल अ‍ॅपच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अॅग्री कॉन्क्लेव्हमधील नाविन्यपूर्ण अ‍ॅप्सपैकी एक भुजल अ‍ॅप होते. सध्या, भूजल अ‍ॅपचा वापर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 300 बोअरवेलवर देखरेख ठेवण्यासाठी केला जात आहे. यासाठी देखील सरकारी योजनेतर्फे निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

दरम्यान, देशभरात सध्या भुजल अ‍ॅपचा वापर 1800 हून अधिक बोअरवेलच्या निरीक्षणासाठी केला जात आहे. तसेच 2023 या वर्षाच्या शेवटपर्यंत ही संख्या 5000 बोअरवेलच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. भूजल निरीक्षणासाठी सध्या बाजारपेठ  साउंडर्स, पायझोमीटर आणि डिजिटल वॉटर लेव्हल रेकॉर्डर यांसारखे महागडे पर्याय उपलब्ध आहेत. तर भुजल अ‍ॅपसुद्धा अशाच प्रकारे काम करुन अनेकांच्या अडचणींवर मात करत आहे. घरगुती, कृषी, औद्योगिक आणि सरकारच्या नेतृत्वाखालील भूजल निरीक्षणासह विविध क्षेत्रांमध्ये याचा प्रभावीपणे वापर केला जात आहे.