कल्याण-डोंबिवलीकरांनो विनाकारण घराबाहरे पडाल तर कडक कारवाईला सामोरे जाल

कल्याण-़डोंबिवलीमध्ये कडक लॉकडाऊनसाठी पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज

Updated: Jul 1, 2020, 08:02 PM IST
कल्याण-डोंबिवलीकरांनो विनाकारण घराबाहरे पडाल तर कडक कारवाईला सामोरे जाल title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोचला असून महिन्याभरात 6925 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मृत्यूचा आकडा 123 पर्यत पोहचला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन व्यवस्था देखील अपुरी पडत असून स्थानिक आमदारांकडून देखील कडक लॉकडाऊनची सातत्याने मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर १० दिवस संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात महामारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

लॉकडाऊनची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात महत्वाच्या 10 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अत्यावश्यक सेवेतील पासधारक वाहने वगळता इतर कोणत्याही वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवा आणि तातडीची मेडिकल इमर्जन्सी वगळता इतर कोणत्याही कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. दुचाकीवर फक्त 1 व्यक्ती आणि रिक्षा आणि चार चाकी गाडीतून फक्त २ व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. नागरिकांसाठी किराणा आणि भाजीपाला घरपोच देण्यासाठी कोव्हीड नियंत्रण समिती सक्रीय ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकाची गय केली जाणार नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा सज्जड इशारा डीसीपी विवेक पानसरे यांनी दिला आहे.

काय बंद राहणार

अत्यावश्यक सेवेची वाहतूक वगळता इतर सर्व सेवा सुविधा बंद राहणार आहे. या काळात कामाव्यतीरिक्त नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव राहील. अत्यावश्यक बाबीच्या खरेदीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. सर्व व्यावसायिक खाजगी आस्थापना बंद राहणार आहेत. जीवनावश्यक वस्तूची उत्पादन केंद्रे सुरु राहतील. सरकारी कार्यालये कमीत कमी कर्मचाऱ्यांसह सुरु राहतील मात्र या कर्मचाऱ्यांना ३ फुटाचे सुरक्षित अंतर राखावे लागेल तसेच स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल.

फक्त घरपोच सेवा

जीवनावश्यक वस्तूची दुकाने, दुध, डेअरी, बेकरी, किराणा मालाची दुकाने, भाजीपाला विक्रीची दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यत सुरु राहतील मात्र या दुकानात कांऊटरवरील विक्रीला परवानगी नसेल. घरपोच मालाची सेवा द्यावी लागेल. मद्य विक्री घरपोच करण्यास परवानगी असेल.

काय सुरु रहाणार?

मेडिकल, रुग्णालय, क्लिनिक, गॅस सिलेंडर आणि लिफ्ट दुरुस्तीची दुकाने नियमित सुरु राहतील. बँका / एटीएम्स, विमा, टेलिकॉम, आयटी, टपाल आणि डेटासेवा, कृषी मालाची ने-आन सुरु राहील. पाळीव प्राण्याचे रुग्णालय आणि खाद्य दुकाने, जीवनावश्यक वस्तूची वाहतूक, पेट्रोल पंप, गॅस, तेल एजन्सी, त्यांची गोदामे, कोरोना नियंत्रणासाठी सहाय्य करणाऱ्या सेवा आणि खाजगी आस्थापना सुरु राहतील.

जर या कालावधीत विवाह करण्याचं आयोजन केलं असेल तर नियमांचं पालन करुन आणि फक्त ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करता येईल.