बंदीजनांचं सुरेल सादरीकरण, कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणूसही हेलावला

वारकरी संप्रदायातील महामंत्रापाठोपाठ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या रचनांसह 'देवा तुझ्या लेकराला लोटू नको दूर' अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणसाचेही मन हेलावून गेलं.

Updated: May 21, 2022, 10:33 PM IST
बंदीजनांचं सुरेल सादरीकरण, कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणूसही हेलावला   title=

पुणे : वारकरी संप्रदायातील महामंत्रापाठोपाठ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या रचनांसह 'देवा तुझ्या लेकराला लोटू नको दूर' अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणसाचेही मन हेलावून गेलं. निमित्त होते ते शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बंदिजनांच्या अभंग व भजन स्पर्धेचं. (successful organization of sant tukaram maharaj state level abhang and bhajan competition for inmates at yerawada jail at pune)

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील कारागृहात असलेल्या बंदीजनांसाठी जगत्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग आणि भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं. पुण्यातील येरवडा कारागृहात आज ( 21 मे)  ही स्पर्धा झाली. 

येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक पल्लवी कदम, वरीष्ठ तुरुंग अधिकारी पी. एस. भुसारे, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी,  भजनसम्राट रघुनाथ खंडाळकर, संगीत विशारद ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजीव मिसाळ, शंकर धुमाळ, कार्याध्यक्ष अश्विनी पाचर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती. कारागृहातील शिक्षक अंगद गव्हाणे, सुभेदार प्रकाश सातपुते यांनी स्पर्धेच्या संयोजनात सहकार्य केलं.

स्पर्धेतील सहभागाबद्दल येरवडा कारागृहातील संघास सौ. दिना व प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फ्रेम आणि प्रबोधनात्मक तसेच प्रेरणादायी 82 पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

अभंग-भजन सादरीकरणासाठी स्पर्धक संघास 25 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. भेटी लागी पंढरीनाथा हा तुकोबांचा, 'नाही कुणाचे कुणी , तुझे नव्हे रे कुणी' हा एकनाथ महाराजांचा अभंग बंदिजनांनी मोठ्या भक्तिभावाने सादर केला. 

भाविकासाठी 'उभा विठु कैवल्याचा गाभा' हा भानुदास महाराजांचा अभंगही दाद मिळवून गेला. स्पर्धेत स्वरचित रचना असावी, अशी स्पर्धेची अट होती. त्याला अनुसरून एका बंदिजनाने रचलेले 'येऊ दे विशाल हृदया करुणेचा पूर' हे काव्य सादर करण्यात आले.

स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका प्रतिष्ठाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी विषद केली. जन्माला येताना कुणीही गुन्हेगार नसतो. अध्यात्माच्या प्रबोधनातून बंदिवानांच्या जीवनाला आधार मिळावा हा स्पर्धा आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितलं.

भविष्यातील वाटचाल योग्य दिशेने होईल

"प्रत्येक व्यक्तीत सुप्त गुण असतात. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्येही ते दिसून आले आहेत. अशा व्यक्तींना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. हातून छोटी जरी चूक झाली असली तरी अशा व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते; पश्चातापाची वेळ येते. कारागृहाच्या चार भिंतींतधून बाहेर पडण्यासाठी व्यक्तीगत सुधारणा हाच मार्ग आहे. अशा मार्गावर जाण्यासाठी अध्यात्माचा-भक्तीचा मार्ग उपयुक्त ठरू शकतो. शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीचे स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच मनपरिवर्तन होईल आणि ते भविष्यात योग्य मार्गाने वाटचाल करतील असा विश्वास आहे. बंदिजनांच्या आध्यात्मिक वाटचालीकडे नेण्यासाठी बीज रावले गेले आहे, त्याचा नक्कीच वटवृक्ष होईल", अशी प्रतिक्रिया येरवडा कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी दिली.