पंढरपूर : सरकोली गावात भीमा आणि माण नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तिकडून पोलीस अवैध वाळू वाहतूकीचे हफ्ते घेत असल्याची बाब कुटूंबियांनी उघड केली आहे. पोलिसांच्या जाचाळा कंटाळून सोमनाथ भालके याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटूंबियांनी केला आहे. घटनेने परिसऱात खळबळ उडाली आहे.
भीमा आणि माण नदीपात्रातून राजरोसपणे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. असाच प्रकार सरकोली गावामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येथील सोमनाथ भालके ही व्यक्ती नेहमीच अवैध वाळू वाहतूक व उपसा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे अवैध काम स्थानिक पोलिसांना हफ्ते देऊन सुरू होते असे कुटूंबियांनी सांगितले.
वारंवार हफ्ते घेऊनही अवैध वाळू उपसा करणाऱ्या सोमनाथवर पोलिसांनी कारवाई केल्याने त्याने आत्महत्या केली. असा आरोप मयताचा भाऊ आबा भालके यांनी केला आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी मयत व्यक्तीचे प्रेत तालुका पोलिस स्टेशन समोर ठेवले आहे.
संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.