तलाठी भरतीनं राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस, अर्ज शुल्कातून मिळाली 'इतक्या' कोटींची रक्कम

Talathi Bharti 2023: महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.  सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची चार हजार ६४४ पदे भरली जातील

Pravin Dabholkar | Updated: Jul 27, 2023, 09:46 AM IST
तलाठी भरतीनं राज्य सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस, अर्ज शुल्कातून मिळाली 'इतक्या' कोटींची रक्कम title=

Talathi Bharti 2023: राज्यात तलाठी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला उत्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. लाखो विद्यार्थ्यांनी तलाठी भरती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. यासंदर्भात आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातून चार हजार ६४४ पदासाठी तलाठी भरती होणार आहे. यासाठी तब्बल साडे बारा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी शुल्क भरलेले १० लाख ४२ हजार उमेदवार परीक्षेला ठरले पात्र ठरले आहेत. 

पात्र उमेदवारांच्या परीक्षा शुल्कातून राज्य सरकारच्या तिजोरीत ९७ कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

तलाठी पदासाठी अर्ज भरण्याची मुदत २५ जुलै पर्यंत होती. अर्ज भरण्यासाठी खुल्या गटासाठी एक हजार तर इतर गटासाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत वाढ झाल्याचे दिसत आहे. 

महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.  सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची चार हजार ६४४ पदे भरली जातील. यासाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे. 

एकच प्रश्नपत्रिका 

महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

टीसीएसकडून होणार परीक्षा 

परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. 

उमेदवारांचा प्रतिसाद

राज्यातील लाखो तरुण तलाठी भरती परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. सुमारे पाच लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

एकाच जिल्ह्यातून अर्ज

तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.