शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार, पेपरचे गठ्ठे बोर्डात परत पाठवले

राज्यभरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी यंदाही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय

Updated: Apr 8, 2018, 02:15 PM IST

औरंगाबाद : राज्यभरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी यंदाही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय,  त्यामुळे औरंगाबाद बोर्डाची अडचण झालीय. औरंगाबाद बोर्डातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेले तब्बल ७४६ पेपरचे गठ्ठे परत आलेत. दुसरीकडे विनाअनुदानित आणि स्वायत्त तत्त्वावरील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी नेलेल्या नाहीत. त्यामुळे आता २५२ प्राचार्यांना बोर्डाने नोटीसा पाठवल्या आहेत. औरंगाबाद बोर्डाने मान्यता रद्द करण्याची तंबी दिली असली तरी शिक्षक मागे हटायला तयार नाहीत.

हे आहे कारण 

विनाअनुदानित तत्त्वावरील शिक्षकांनी मुंबई, पुणे, नागपूर इथं आंदोलने केली होती. त्यानंतरही सरकारकडून अनुदान याद्या जाहीर करून त्याची तरतूद केली गेली नाही, शिवाय शंभर टक्के अनुदानही देत नाही, त्यामुळे पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला. यंदा औरंगाबाद बोर्डातील १ हजार १८६ कॉलेजेसच्या १ लाख ६४ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यामध्ये  ३५० एकूण अनुदानित कॉलेज आहेत. तर ८३६ विनाअनुदानित कॉलेजेस आहेत.  आतापर्यंत पेपर न तपासता जवळपास साडेसातशे गठ्ठे परत आलेत.