Irshalwadi Landslide News : रायगडमधील इरसालवाडी दरड दुर्घटनेतील शोधकार्य आता थांबवण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 19 जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या इरसालवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह हाती लागले असून अजून 57 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
तब्बल चारदिवस इरसालवाडी इथं शोधकार्य सुरू होतं. मात्र दुर्गंधी आणि मृतदेहांचं विघटन सुरू झाल्यानं शोधकार्य थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. तळीयेप्रमाणे इथंदेखील बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिडकोतर्फे दरडग्रस्तांना कायमस्वरूपी घरे बांधून दिली जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इरसालवाडीला भेट देऊन इथल्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. दुर्गम डोंगराळ भागातील नागरिकांचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसंच बचाव आणि शोध यंत्रणांनी केलेल्या कामगिरीचं त्यांनी कौतुकही केलं.
इरसालवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरता निवारा उभारला जाणार आहे. चौक इथे कंटेनर वसाहत उभारण्यात आलेय. येथे सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. सध्या सर्व दरडग्रस्त नानिवली गावात प्राथमिक शाळेत आहेत. त्यांचं पुनर्वसन या वसाहतीत केलं जात आहे.
इरसालवाडी दुर्घटनेत बचावलेल्या मात्र आईवडिलांचं छत्र गमावलेल्या मुलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आलेत. मुख्यमंत्र्यांनी या मुलांचं पालकत्व स्वीकारलंय. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हे पालकत्व स्वीकारलंय. मुलांचं पालनपोषण, शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्र्यांतर्फे केला जाईल. इरसालवाडीतील पीडितांसाठी पुण्यातून मदत पाठवण्यात आली आहे. वैद्यकीय पथक इरसालवाडीकडं पोहचले आहे. पुण्यातील भोई प्रतिष्ठाननं ही मदत पाठवली. पालक गमावलेल्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व या संस्थेनं स्वीकारल आहे.
इरसालवाडीतल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात प्रशासन खडबडून जागं झालंय. रायगडच्या पेण तालुक्यात चांदेपट्टी गावातल्या 34 ग्रामस्थांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आले. पेण जवळच्या गणपतीवाडी इथल्या मराठा भवनमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. उर्वरित ग्रामस्थांचं आज स्थलांतर करण्यात येईल. गेल्या 18 वर्षांपासून हे ग्रामस्थ दरड आणि भूस्खलनाच्या छायेत वावरतायत. बॉक्साईटच्या उत्खननामुळे या गावाला दरडीचा धोका आहे. तेव्हा कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दाखवली.