शेअर मार्केटचा नाद दावी गुन्हेगारीची वाट

चार महिन्यांपासून करत होते चोरी, मुद्देमाल सह दोन कार आणि एक दुचाकी केली जप्त 

Updated: Jul 19, 2022, 07:49 PM IST
शेअर मार्केटचा नाद दावी गुन्हेगारीची वाट
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

योगेश खरे, नाशिक-  शेअर मार्केट मध्ये कमी वेळेत मिळणारा पैसा बघता तरुण मुल याकडे वळाली आहे. मात्र यात मोठे नुकसान झाल्याने नाशिक मधील सुशिक्षित आणि उच्च शिक्षित मुलाने मित्राला सोबत घेऊन घर फोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

गेल्या आठवड्यात नाशिक मधील जयभवानी रोडवरील एका बंगल्यात घरफोडी झाली होती. या घरफोडीत २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसान मिळालेल्या माहितीवरून संशयित रोहन संजय भोळे आणि मित्र ऋषिकेश मधुकर काळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. याची चौकशी करत असताना संशयित आरोपींनी चोरी कबुली दीली आहे. 

काय होती घटना
नाशिकच्या जयभवानी रोडवर संजय ईश्वरलाल बोरा यांचा “ईश्वर” नावाचा बंगला आहे. हा बंगला १० जुलै रोजी बंद होता. बंगला बंद असल्याचे पाहून रोहन भोळे आणि मित्र ऋषिकेश काळे या दोघांनी चोरी करण्याचा विचार केला. या दोघांनी बंगल्याचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून बंगल्याच्या आता प्रवेश केला. बंगल्यात असलेल्या तिजोरीतील सोन्या-चांदीचे हिरेजडीत दागिने आणि रोकड घेऊन चोरटे दोघेही चारचाकी मोटारीतून फरार झाले. बोरा हे घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बोरा यांनी या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

‘गेट ॲनालिसिस’द्वारे गुन्हा उघडकीस
या गुन्ह्याचा तपास युनिट शाखा २ कडे देण्यात आला होता. या गुन्ह्यासह इतर गुन्ह्याचा समांतर तपास करत सुरु होता. हवालदार प्रकाश भालेराव यांना रोहन आणि ऋषिकेश येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. दोघ येणार त्याठिकाणी सापळा रचण्यात आला. रोहन आणि ऋषिकेश एका कार मध्ये आले असता पोलिसांनी त्यांची कार अडविली. दोघांनाही विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.  

‘गेट ॲनालिसिस’द्वारे या दोघांची देहबोली, चालण्याची ढब आणि बंगल्यात घरफोडी करताना, सीसीटीव्हीत कैद झालेले चोरट्यांची हालचाल पडताळून बघितली गेली. ती एकसमान आढळून आले.

का केली चोरी
रोहन भोले याने शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले होते. मात्र यात त्याचे मोठे नुकसान झाले होते. हा पैसा कसा भरून काढावा याचा विचार तो सातत्याने करत होता. चोरी केल्यास आपल्याला पैसे लवकर मिळतील या उद्देशाने रोहन चोरी करू लागला. यात त्याने त्याचा मित्र ऋषिकेश काळे याला सोबत घेतले. 

चार ते पाच महिन्यात संशयित रोहन आणि ऋषिकेश चोरी करत आहेत. मे महिन्यात जयभवानी रोडवरील एका बंगल्यात चोरी केली होती. यानंतर त्यांनी १० जुलैला ईश्वर बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या दोघांकडे सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यातील कार (एम.एच.०३ बीई०८४८), मारुती स्विफ्ट (एम.एच१५ जीएल ९१४२) ॲक्सेस दुचाकी (एम.एच१५ ईबी३०३३) दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघा संशयितांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.

Tags:

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x