Maharashtra Congress : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठं खिडार पडलं आहे. अनेक नेत्यांनी भारत जोडता जोडता काँग्रेस पक्ष सोडला आहे. काँग्रेस उभारण्यात ज्यांचा हात होता त्याच नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी, मिलिंद देवरा, ज्योतिरादित्य शिंदे ते गुलाम नबी आझाद या बड्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते यांनी आज काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजकीय निर्णय दोन दिवसांत सांगतो, सध्या मला कुणाची उणीधुणी काढायची नाहीत, असे अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. त्याशिवाय काँग्रेसमधील कोणत्याही आमदारांशी संपर्क साधलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या आधी माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. 47 वर्षीय मिलिंद देवरा यूपीए-2 च्या कार्यकाळात काही काळ मंत्री होते. मिलिंद देवरा यांनी ट्विट करून पक्ष सोडल्याची माहितीही दिली होती. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा फटका बसलाय.
8 फेब्रुवारी 2024 रोजी माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काँग्रेसला रामराम केला. तब्बल 48 वर्षांचा काँग्रेससोबतचा प्रवास त्यांनी संपवला. सिद्दीकी यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलाय. झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेय. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च 2020 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचं वर्चस्व आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्येही ते आघाडीवर असायचे. त्यांनी काँग्रेसकडून चार वेळा खासदारपद भूषवलं होतं. 2002 ते 2019 पर्यंत त्यांनी काँग्रेसकडून खासदारकी भूषवली. 2020 मध्ये त्यांनी कमळ हातात घेतले. त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आले. पण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस वाढवण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी 22 आमदारांसा सोबत घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कमलनाथ सरकार आल्यानंतर वर्षभरात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेश काँग्रेसवर प्रचंड नाराज होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती.
जितिन प्रसाद यांनी 23 काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. जितिन प्रसाद यांनी काँग्रेससाठी उत्तरप्रदेशमध्ये दोन दशकांपेक्षा जास्त काम केले होते. उत्तर प्रदेशातील ते काँग्रेसचे मोठे नेते असून राज्यातला काँग्रेसचा मुख्य चेहरा मानले जात होते. त्यांनी तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. उत्तर प्रदेशातून ते दोन टर्म खासदार राहिले आहेत. जितिन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. जितिन प्रसाद यांना राहुल गांधींचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
सुष्मिता देव यांनी ऑगस्ट 2001 मध्ये काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी महिला काँग्रेसचं अध्यक्षपद भूषावलं होतं. त्याशिवाय त्या खासदारही राहिल्यात. आसाममधील काँग्रेसचं मोठं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांनी काँग्रेसचा हात सोडून ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आसाम काँग्रेसवर त्या नाराज होत्या, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मोदी लाटेतही सुष्मिता देवी 2014 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण अंतर्गात वादामुळे त्यांना काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 2001 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीआधी अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत पंजाब लोक काँग्रेस नावाच्या पक्षाची स्थापना केली. वर्षभराआधीच पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात आला. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पक्ष सोडल्याचा काँग्रेसला मोठा पटका बसला.
उत्तर प्रदेशमधील आरपीएन सिंह यांनी 2022 मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या मोठ्या नावापैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जात होते. राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणूनही त्यांना ओळखलं जायंचं. तीन दशकांपेक्षा जास्त काळ ते काँग्रेससोबत होते. ते काँग्रेसकडून तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले. त्याशिवाय आरपीएन सिंह यांचे वडील इंदिरा गांधी सरकारमध्ये मंत्री होते. आरपीएन सिंह मनमोहन सरकारमध्ये राज्यमंत्री होते.
कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी मे 2022 मध्ये काँग्रेसचा हात सोडला. काँग्रेसच्या G-23 गटाचा प्रमुख भाग असलेले कपिल सिब्बल यांनी काँग्रेससोबतचा प्रवास तांबवला. त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. मनमोहन सरकारमध्ये कपिल सिब्बल केंद्रीय मंत्री होते. तीन दशकांपर्यंत त्यांनी काँग्रेससोबत काम केले. कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील G-23 या गटाचा भाग होते. गेल्या काही काळापासून ते पक्षाच्या ध्येयधोरणांवर नाराज होते.
एप्रिल 2022 मध्ये सुनिल जाकड यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत असताना फेसबुक लाईव्हच्या माझ्यमातून त्यांनी काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून तीन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले आहेत. काँग्रेस नेतृत्वावर उघडपणे टीका करुन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
ऑगस्ट 2022 मध्ये गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पाच पानाचं पत्र लिहून आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. जम्मू काश्मिरचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं. त्याशिवाय केंद्रात मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी स्व:तच्या पक्षाची स्थापना केली. चार दशकांसोबत त्यांनी काँग्रेससोबत काम केले. या काळात त्यांनी अनेक पदं उपभोगली. राज्यसभेत विरोधीपक्षनेता म्हणूनही काम केले.
जयवीर शेरगिल यांनी ऑगस्ट 2022 मध्ये काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिला, त्याच महिन्यात जयवीर शेरगिल यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला.जयवीर शेरगिल यांनी काँग्रेस सोडता पक्षश्रेष्ठीवर टीकास्त्र सोडले होते. शेरगिल यांनी 2012 मध्ये काँग्रेसमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण राष्ट्रीय मीडिया पॅनेल सदस्य होते. पंजाबमधील तरुण तडफदार नेतृत्व म्हणून काँग्रेसमध्ये त्यांची ओळख होती.