गेवराई : भवानी अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरावर बुधवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यात दरोडेखोरानी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली असुन दोन्ही मुलींनाही धारदार शस्त्राने बेदम मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करत पाबोरा केला. दरम्यान या घटनेमुळे गेवराई तालुका हादरला आहे.
गेवराई शहरातील सरस्वती काॅलनीत गेल्या अनेक वर्षापासून भवानी अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे राहतात. त्यांच्या घरी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा वाजवला असता घाडगे यांच्या पत्नी अलका यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
आदीनाथ घाडगे तसेच घरात असलेली बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव आणि स्वाती घाडगे या दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. यात वर्षाची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही मुलींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलं आहे. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत आदीनाथ घाडगे आणि अलका घाडगे या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे.