आधीच हवालदिल त्यात एका ठिणगीचा कहर, लाख मोलाचं सोनं मातीमोल...

ऊस तोडणीची तारीख उलटून गेली आहे. मात्र, अजूनही साखर कारखाना ऊस नेत नाहीत. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच... अशा दोन घटना घडल्या की...  

Updated: Apr 1, 2022, 01:35 PM IST
आधीच हवालदिल त्यात एका ठिणगीचा कहर, लाख मोलाचं सोनं मातीमोल... title=

बीड/जालना : महावितरणच्या गलथान कारभारामुळे गेल्या दोन महिन्यात शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. अशा घटना वारंवार घडत आहे. यातच बीडमधील एका महिलेचा डोळ्यासमोर जळालेला ऊस पाहून काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश समोर आलाय.

हा आक्रोश पाहून आता तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का असा प्रश्न पडला आहे. उसाचं पीक चांगलं आलं. ती विकून काही स्वप्न पूर्ण होण्याची अशा तिनं धरली. मुलीचं लग्न करावं, मुलाचं शिक्षण करावं याचे तिने प्लॅन तयार केले.

पण... नशिबानं नव्हे तर महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे तिच्या शेतातला ऊस तिच्या डोळ्यादेखतच खाक झाला.

आता मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण कसं करावं. ऊस जळून गेलाय काय कराच आता.. आम्ही या उसाला फाशी घ्यायची का? लई स्वप्न पाहिले होते.. मुलीचं लग्न मुलाचं शिक्षण कस पूर्ण करायचं, हाणून घ्यावं का.. भरपाई कोण देणार..याच उसाला फाशी घ्यावी का म्हणत या शेतकरी महिलेने हंबरडा फोडला. या महिलेचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

तर दुसरी घटना आहे जालना जिल्ह्यातील. परतूर, आष्टी परिसरात ऊस तोडणीची तारीख उलटून गेलीय. शेतकरी साखर कारखाना ऊस कधी नेणार या विवंचनेत आहे. साखर कारखान्यांनी ऊस न नेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अशातच... ही दुर्दैवी घटना घडलीय...

परतूर तालुक्यातील बाणाचीवाडी येथे 20 एकर उसाच्या फडाला आग लागली. या आगीत आठ शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत उन्हाची तीव्रता आहे. त्यामुळे ही लागलेली आग विझविणे मोठी समस्या निर्माण झालीय.

या परिस्थितीमुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. परतूर येथील नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडीला पाचारण करण्यात आले. वेळीच ही गाडी आल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आलं.

 

पण, ही आग नेमकी कशामुळे लागली. याचा शोध घेतला असता एक धक्कदायक कारण पुढं आलं. या शेताजवळ विजेच्या तारा होत्या. त्या विजेच्या शॉर्ट सर्किट झाला. त्यातील एक ठिणगी उसाच्या उडाली आणि सुकलेल्या उसाने क्षणात पेट घेतला.  दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करुन महावितरणने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.