जळगाव : फोटोत दिसणारी ही सुंदर शाळा जिल्हा परिषदेचीच आहे. जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात सरासरी तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत असतं. आजही जिल्ह्यात इंग्रजांच्या काळात बनवलेल्या कौलारु शाळा आहेत. या शाळांना कौलारु छत असल्याने उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना थंडावा, हिवाळ्यात उब देतात, तर पावसाळ्यात पावसाचा छपरावरचा आवाज कमी होतो.
या दहिवद,( ता. अमळनेर, जि. जळगाव) गावातील काही पुढाऱ्यांनी या शाळेवर लोखंडी पत्रा ठोकण्याचा विचार केला. पण गावातील युवकांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला. या शाळेच्या छपरावर दुरुस्तीनंतर कौलच टाकली गेली पाहिजेत. यावर मोठ्या प्रमाणात तरुण आणि माजी विद्यार्थ्यांनी एकमत केलं. खाली सागवान पाटी आणि वर कौल असेल तर अशा छपराला कमीत कमी ५० वर्ष आयुष्य असतं, ही शाळा शंभर ते ९० वर्ष जुनी आहे असं म्हणतात.
या बाबतीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला देखील माहिती देण्यात आली. पण तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी (सीईओ) दुर्लक्षच केलं.
ही दहिवद, ता. अमळनेर, जिल्हा जळगाव येथील ही जिल्हा परिषद मराठी शाळा आहे, प्रत्येक जि.प. शाळेप्रमाणे ही आज सर्वसामान्यांसाठी जीवन शिक्षण मंदिरच आहे. हे शिक्षणाचं मंदिर वाचवण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला.
गावातील युवकांनी ग्रामसभेत शाळेची कौलं काढून लोखंडी पत्रा लावण्यास विरोध केला. गावातील एक तरुण पंकज देसले याने, शाळेचं छत कौलारु नको, असं म्हणणाऱ्या पुढाऱ्याला भर ग्रामसभेत सांगितलं.
''तुमची मुलं, नातवंड या जिल्हा परिषदेच्या शाळेत जात असतील तर कौलांना विरोध करा, ज्यांची नातवंड आणि मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतील त्यांनी शाळेच्या विषयावर बोलायचं नाही. तर शाळेवर कौल टाकण्याचा निर्णय घेण्यात आम्ही सक्षम आहोत'' आणि ग्रामसभेत बहुमताने शाळेवर कौलं टाकण्याचा दुरुस्तीचा ठराव पास झाला.
पुढे जिल्हा परिषद याबाबतीत कोणतीही मदत करण्यास तयार नसल्याने, ग्राम पंचायतीत सरकार बदलण्याची वाट पाहिली गेली. शेवटी सत्ताबदल झाल्यानंतर ग्राम पंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून शिक्षण या विषयावर शाळेच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं.
२५ वर्षाचा तरुण शिवाजी पारधी या युवकाने ग्राम पंचायतच्या वित्तिय आराखड्यात शाळा दुरुस्तीचा प्रस्ताव दाखल केला. सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारल्या आणि आज ही सुंदर शाळा उभी राहिली.
फक्त दुरुस्तीच नाही, मजबुतीवर लक्ष देण्यात आलं, आधी शाळेची कौल डोक्यात पडण्याची भीती होती, म्हणून या संपूर्ण शाळेला खालून सागवानी लाकडाच्या पाटीचा आधार देण्यात आला.
आश्चर्य म्हणजे जेवढ्या पैशांत लोखंडी पत्रा ठोकला जाणार होता, तेवढ्या पैशात कौलारु शाळा, छताला सागवानी पाटी, संपूर्ण शाळेला प्लास्टर, रंगरंगोटी आणि एका बिल्डिंगला कोटा फरशी बसवून झाली.
पण याबाबतीत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दिरंगाई केली, नियम दाखवले. अखेर गावातील तरुणांच्या जिद्दीपुढे जळगाव जिल्हा परिषदेचं बांधकाम विभागाचं प्रशासन झुकलं आणि 'गावकरी ते रावकाय करी' म्हणत अखेर या चांगल्या कामात सहभागी व्हायचं असं सांगून प्रशासनाने वाट अडवण्याची सवय सोडून दिली.
कामं उशीराने झालं पण पूर्ण झालं. फोटोत ज्या प्रमाणे तुम्ही ही शाळा पाहत आहात, यात कुणालाही कमिशन दिलं गेलेलं नाही. कारण पडद्याआड कमीशनचा एवढा रोग असतो की, कंत्राटदारही कामावर लक्ष देत नाहीत. पण येथे कंत्राटदाराकडून प्रमाणापेक्षा जास्त काम करुन घेण्यात आलं.
या शाळेने अनेकांना मोठमोठ्या पदांवर आणून ठेवलं, माजी विद्यार्थ्यांनाच काय प्रत्येकाच्या मुलांसाठी आज सुखाचा घास मिळतो, तो याच शाळेमुळे. आता ही शाळा पाहून प्रत्येक माजी विद्यार्थ्याना यावर गर्व होतो, आणि समाधान वाटतं की, ही माझी शाळा आहे.
जळगाव जिल्ह्यात अशा शाळा बहुतांश गावात आहेत, प्रत्येक गावातील तरुणांनी एक होवून या सुंदर शाळा वाचवल्या पाहिजेत. यासाठी एक चळवळ उभी राहण्याची गरज आहे.
कारण जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या प्रशासनात काही असे अधिकारी आहेत, त्या या सुंदर इमारती संपवून, नव्या वेड्यावाकड्या, निकृष्ट इमारती बांधून स्वत:चं भलं करण्यात, हे काही अधिकारी समाधान मानतात, पण यामुळे पुढील पिढ्या अंधारात जाणार नाहीत, याची काळजी त्या-त्या गावातील तरुणांनी घेतली पाहिजे.