चर्चा तर होणारच ! शेअर मार्केटच्या पैशातून घेतला बंगला, म्हणून बंगल्याचं नाव ठेवलं...

बंगल्याच्या या आगळ्यावेगळ्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे

Updated: Dec 17, 2021, 06:34 PM IST
चर्चा तर होणारच ! शेअर मार्केटच्या पैशातून घेतला बंगला, म्हणून बंगल्याचं नाव ठेवलं... title=

चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, बदलापूर : नवी घर किंवा बंगला बांधला की आपण त्याला एखादं छानसं नाव देतो. आई-वडिलांची कृपा, आपल्या जवळच्या व्यक्तीचं किंवा देव-देवताची नावं दिल्याचं आपण अनेकदा पाहतो. पण आपण ज्या व्यवसायात आहोत, त्या व्यवसायाचं नाव बंगल्याला कधी दिल्याचं आपण पाहिलं आहे का. 

पण ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका व्यावसायिकाने आपल्या नव्या बंगलाला चक्क व्यवसायाचं नाव दिलं आहे. बदलापूरमध्ये हा बंगला सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या मुकुंद खानोरे यांनी या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुर केली. आज ते शेअर मार्केटमधले तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मेहनतीच्या जोरावर त्यांनी शेअर मार्केटमध्ये चांगलं यश मिळवलं. 

ज्या व्यवसायाने आपल्याला मोठं केलं, नाव मिळवून दिलं, त्या व्यवसायाबद्दल कृतज्ञता म्हणून मिलिंद खानोरे यांनी आपल्या बंगल्याचं नाव चक्क 'शेअर मार्केटची कृपा' असं ठेवलं आहे.

शेअर मार्केटच्या माध्यमातून कोट्यधीश झालेल्या मिलिंद खानोरे यांनी बंदलापूरजवळच्या कासगावमध्ये बंगला बांधला. या बंगल्याचं नाव त्यांनी 'शेअर मार्केटची कृपा' असं ठेवलं आहे. बदलापूर कर्जत राज्य महामार्गावरून जाताना हा बंगला हमखास नजरेस पडतो. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या बंगल्याची या महामार्गावरुन जाणाऱ्यामध्ये आणि या भागात मोठी चर्चा आहे. 

शेअर मार्केटमुळेच आपल्याला आर्थिक सुबत्ता आणि यश मिळालं असून शेअर मार्केट बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे नाव ठेवल्याचं मिलिंद खानोरे सांगतात.

आयुष्यात प्रत्येक जण वेग वेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र अश्या प्रकारे स्वत:च्या घराला 'शेअर मार्केटची कृपा 'हे नाव देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची चर्चा  नागरिकांमध्ये होत आहे.