हजार गिर्यारोहक अडकले नदीच्या पुरात, बंदी असताना सुद्धा पर्यटकांची गर्दी...

पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावले पर्यटकांचे प्राण

Updated: Jul 11, 2022, 04:58 PM IST
हजार गिर्यारोहक अडकले नदीच्या पुरात, बंदी असताना सुद्धा पर्यटकांची गर्दी...  title=

सोनू भिडे, नाशिक - नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्रंबकेश्वर, पहिने, हरिहर गड, कळसुबाई शिखरासह अनेक पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात राज्यातून पर्यटक याठिकाणी येत असतात. त्यात शनिवार रविवार म्हटला तर पर्यटकांची जणू यात्राच भरते. मात्र काही नागरिकांचा अति उत्साह जीवावर बेततो. 

राज्यात पावसान जोरदार हजेरी लावली आहे. सर्वत्र नदी नाले वाहू लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीलाही पूर आला आहे. या पुरामुळे शिखरावर गेलेले एक हजार पर्यटक पायथ्याशी अडकले होते. या पर्यटकांची स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

काय आहे घटना
कळसुबाई शिखरावर शनिवारी (९ जुलै) प्रचंड पाऊस पडत होता. हे संपूर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत होत. यामुळे कृष्णावंती नदीला पुर आला होता. शनिवार सकाळी हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहणासाठी रवाना झाले होते. मात्र काही वेळानंतर पावसाने जोर धरल्याने शिखरावर चढणे शक्य नसल्याने सर्व पर्यटक शिखरावरून खाली उतरू लागले होते. कृष्णावंती नदीला पूर आल्याने पर्यटक बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते.

पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती राजूर पोलिसांना देण्यात आली. राजूर पोलीस ठाण्याचे पथक घटना स्थळी दाखल झाले. नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना नदीवरील एका केटीवेअरवर उभे करण्यात आले. दोराच्या सहाय्याने साखळी करत बाहेर या सर्व गिर्यारोहकांना काढण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य करत सर्व पर्यटकांना सुखरूप वाचविण्यात आले. हे सर्व गिर्यारोहक मुंबई, औरंगाबाद, पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील असल्याच सांगण्यात आलं आहे. 

प्रशासनांची तारांबळ
अतिउत्साह जीवावर बितू नये याकरिता जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. हरिहर गडावर तसेच कळसुबाई शिखरावर पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आलं आहे. पोलीस जागोजागी तपासणी करत आहे. तरी सुद्धा काही पर्यटक नजर चुकवून धोक्याची ठिकाणी जात असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.