संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती?

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या (CID) तपासात धक्कायदायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहऱण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला असल्याची माहिती झी 24 तासाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 7, 2025, 04:12 PM IST
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती? title=

Santosh Deshmukh Murder Case: बीडमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी झी 24 तासच्या हाती आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या (CID) तपासात धक्कायदायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहऱण करून त्यांची हत्या करतानाचा व्हिडिओ सीआयडीला मिळाला असल्याची माहिती झी 24 तासाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करण्यात आला होता. त्यामुळे सीआयडीला मिळालेला व्हिडिओ हत्या प्रकरणातील मोठा पुरावा असल्याची माहिती आहे.

या व्हिडिओमधून अनेक प्रश्नांची उत्तरे आता मिळू शकतील. या व्हिडिओसह सीआयडीच्या पथकांनी अनेक शस्त्रं जी मारहाण करताना वापरली ती जप्त केली आहेत. त्यात 41 इंचाचा गॅस पाईप, लोखंडी रॉड, पाच वायर, लाकडी दांडा, तलवारीसारखे शस्त्र, एक कोयता, एक लोखंडी फायटर असे पोलिसांनी जप्त केल्याचे माहिती मिळत आहे.

बीडमध्ये 74 जणांचे पिस्तूल परवाने रद्द

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानंतर पोलिसांसह आता जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. गुन्हे दाखल असलेल्या 74 जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अंजली दमानिया यांनी व्हिडीओ पोस्ट केलेल्या कैलास फडचा देखील पिस्तूल परवाना रद्द करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 74 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 1281  शस्त्र परवाने दिले आहेत. - परवाने देण्यात आलेल्यापैंकी 232  जणांवर 1 ते 16 गुन्हे आहेत. 

दरम्यान सुरेश धस आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. त्यामुळे आजच्या भेटीत यावर चर्चा होणार का? हे पाहावं लागणार आहे.