मेळघाट येथील अपघातात तीन पर्यटकांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

परतवाडा-धारणी मार्गावर भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघे गंभीर जखमी आहेत. 

Updated: Sep 3, 2020, 09:05 AM IST
मेळघाट येथील अपघातात तीन पर्यटकांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी  title=

 अमरावती : परतवाडा-धारणी मार्गावर भीषण अपघात झाला. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघे गंभीर जखमी आहेत. भरधाव वेगात असणारी क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. यावरुन अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, यापैकी दोघांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सर्व जण अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील आहेत. 

पावसाळ्यामुळे मेळघाटचे निसर्ग सौंदर्य बहरले असून मेळघाटात पर्यटनासाठी गर्दी होऊ लागली आहे. बोरगाव मंजू येथील रहिवासी असणारे सात तरुण मेळघाटात फिरायला गेले होते. घरी परतत असताना रात्रीच्या सुमारास त्यांच्या क्रूझर गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावर आदळली. 

घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील तीन तरुण घटनास्थळीच ठार झाले. तसेच चार जण गंभीर झाले. यापैकी दोघांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सातही तरुण २३ ते २६ वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.