Tiktok Star संतोष मुंडेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार

सर्वांना खळखळून हसवणारा संतोष मुंडे चाहत्यांना रडवून गेला, संतोषच्या मृत्यूने ग्रामस्थ आक्रमक... महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Updated: Dec 14, 2022, 05:39 PM IST
Tiktok Star संतोष मुंडेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड :  जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावचा टिक टॉक स्टार असलेल्या संतोष मुंडे (Tiktok Star Santosh Munde) याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक आणि गावकरी आक्रमक झाले असून महावितरणचे (MSEB) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका भोगलवाडीच्या गावकऱ्यांनी घेतली आहे. संतोष मुंडे हा टिक टॉक स्टार होता आणि इंस्टाग्रामवर (Instagram) देखील त्याचे लाखो फॉलोअर्स (Followers) होते. 

महावितरणाचा गलथाण कारभारामुळे मृत्यू

धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे आणि त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागुन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

कुटुंब आणि ग्रामस्थ आक्रमक
महावितरणच्या गलथाण कारभारामुळेच संतोष मुंडेचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार होता आणि इंस्टाग्रामवर देखील त्याला लाखो फॉलॉवर्स आहेत. मात्र त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : दोस्त, दोस्त ना रहा! दारू पाजून मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार... Video व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला

लाखो चाहत्यांना खळखळून हसवणारा संतोष मुंडे कोण? 
संतोष मुंडे हा टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होता. संतोषनं अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गावरान बाज आणि अस्सल गावरान साज यांचा मेळ संतोषच्या टिकटॉक व्हिडीओंमध्ये चाहत्यांना पाहयला मिळायचा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोषनं आपल्या नावाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं होतं. संतोष गावरान स्टाईलमधील हटके व्हिडीओंसाठी ओळखला जायचा. टिकटॉकनंतर संतोषनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियावर अल्पावधीतच तो लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता.