Sushma Andhare Apologized : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांची माफी मागितली आहे. त्याचवळी त्यांनी ईडी मागे लावता येत नसल्याने जुने व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचा टोला विरोधकांना लगावला आहे. दरम्यान, वारकऱ्यांनी अंधारे यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला आहे. वारकरी सांप्रदायाने सुषमा अंधारे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सच्च्या वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. पण भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीकडूनच बदनामी केली जात असल्याचा आरोपही सुषमा अंधारेंनी केला आहे. कोरोनामुळे जेव्हा मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. तेव्हा या निर्णयाला विरोध करणारा हा तुषार भोसले यांचा कंपू होता, अशी टीकाही त्यांनी केली. वारकऱ्यांबाबतचा व्हिडिओ हा 2009 मधला असल्याचे अंधारेंनी स्पष्ट केले आहे. हे व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याचे भाजप आघाडीचं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून आळंदी येथील वारकऱ्यांनी त्यांना त्याच्याच भाषेत उत्तर देत आंदोलन केले आहे. आळंदीतचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
वारकरी संप्रदायासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत आळंदीमध्ये वारकरी अनुयायांनी सुषमा अंधारे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. अंधारे यांचा निषेध नोंदवला. दरम्यान, बंडाकाका कराडकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
अंधारे यांनी एका भाषणादरम्यान संत एकनाथ महाराज आणि वारकरी संप्रदायासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. अंधारे यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. वारकरी संप्रदाय हा जातीपाती न मानणारा असून साधुसंतांनी समानतेचा आणि एकीचा पाया रचल्याचे देखील वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचे म्हणणे आहे. जातीविरहित भक्ती संप्रदायाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.