ठाण्यात प्रवासादरम्यान मिळणाऱ्या गरमागरम 'ट्रॅफीक' वडापावची चर्चा

 ठाण्यातील तरुण उद्योजकाचा अभिनव प्रयोग...

Updated: Jan 5, 2020, 06:11 PM IST
ठाण्यात प्रवासादरम्यान मिळणाऱ्या गरमागरम 'ट्रॅफीक' वडापावची चर्चा

कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : वडापाव म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र ठाण्यातील एका तरुण उद्योजकानं नव्या पद्धतीनं वडापाव विक्री सुरु केली आहे. जर संध्याकाळच्या वेळेत तुम्ही ठाण्यातील तीन हात नाका परिसरातून प्रवास करत असाल आणि तुम्हाला भूक लागली असेल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण गाडीत बसल्या बसल्या तुम्हाला गरमा गरम वडापाव आणून दिला जाईल. 

ठाण्यतील गौरव लोंढे या तरुणाचं हे भन्नाट स्टार्टअप असून, याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. गौरवनं आपल्या तीन मित्रांच्या मदतीनं हा व्यवसाय सुरू केला असून, तीन हात नाक्यावर संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत वडापाव विकतात. या वडापावचं वैशिष्ट्य म्हणजे पिवळ्या रंगाच्या ड्रेसकोड असलेले तरुण तुमच्या गाडीजवळ गरमागरम वडापाव आणून देतात. यात एक वडापाव, पाण्याची बाटली आणि एक टिश्यू पेपर दिला जातो. आणि हे सगळं तुम्हाला वीस रुपयात मिळतं. 

स्वतःचा ड्रेसकोड, वेबसाईट, फेसबूक पेज आणि ग्राहकाला गरम गरम वडापाव देण्याची जिद्द हे सगळं कॉम्बीनेशन एवढं भन्नाट जमलंय की सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे.