हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याला कुंपण, गिर्यारोहकांमध्ये संताप

हे पाऊल उचलण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.   

Updated: Apr 28, 2019, 07:21 PM IST
हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याला कुंपण, गिर्यारोहकांमध्ये संताप title=

पुणे : महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले म्हणजे गिर्यारोहकांची हक्काची ठिकाणं. याच महाराष्ट्रात गिर्यारोहकांची परवणी आणि त्यांची पंढरी म्हणून ओळख असणारी एक वाट म्हणजे हरिश्चंद्रगडाची. याच हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध कोकणकड्याला कुंपण घालण्यात आलं आहे. हा संपूर्ण परिसर वनखात्याच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण, हे कुंपण नेमकं का आणि कोणातर्फे घालण्यात आलं हाच प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे अशा कुंपणामुळे कोकणकड्याच्या नैसर्गिक सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याची बाब अधोरेखित करत गिर्यारोहकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.  

हरिश्चंद्रगडावर घालण्यात आलेल्या कुंपणामुळे अनेक गिर्यारोहकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. अनेक किल्ले, किंवा निसर्गाच्या सानिध्ध्यात असणाऱ्या अनेक वास्तूंची, तिथे जाणाऱ्या वाटांची हानी होत असतानाच अशा ठिकाणी जिथे खरंच संवर्धनाची गरज आहे, तिथे मात्र शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. तर इथे अनेक गिर्यारोहण संस्था स्वखर्चाने आणि स्वबळावर या वास्तुंच्या जतनाचं काम हाती घेण्य़ासाठी तयाक आहेत. पण, त्यांना मात्र शासनाकडून परवानगी देण्यात येत नाही आहे. त्यामुळे अनेक स्तरांतून सासनाच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

शासनावर ही नाराजी असतानाच आता कोकणकड्यावर थेट कुंपण घालण्यास नेमकी सरकारमधील कोणत्या खात्याकडून परवानगी देण्यात आली की हा कुंपण घालण्याचा प्रकार अन्य कोणाकडून करण्यात आला आहे, असेच असंख्य प्रश्न उपस्थित राहत आहेत.