आयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू

अलिबागमध्ये दोन भावांचा दुर्दैवी अंत झाला आहे. वर्षा सहल या भावांच्या जीवावर बेतली आहे. 

Updated: Jul 17, 2023, 09:04 PM IST
आयुष्यातील शेवटचा पाऊस ठरला; अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू  title=

Alibag News : सध्या सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेकजण वर्षा पर्यटन सहलींचे आयोजन करत आहेत. मात्र, याच वर्षा सहली जीवघेण्या ठरत असल्याचे दिसत आहे. कारण,  अलिबागमध्ये दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी, एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोन्ही भावंडाच्या आयुष्यातील हा शेवटचा पाऊस ठरला आहे. पाण्यात बुडून यांचा मृत्यू झाला आहे. 

पेण तालुक्यातील पाबळ बरडा वाडी येथील नदीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ईलान वासकर आणि इजरायल वासकर अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही अलिबाग तालुक्यातील रेवदंडा थेरोंडा येथील रहिवासी आहेत. दोघांचेही मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आलंय. आपल्या अन्य दोन मित्रांसह दोघेही पावसाळी पर्यटनाला आले होते. तिथं नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न दोघेही वाहत जावून बुडाले.

ठाण्यातील उपवन तलावात एक मुलगा बुडाला

ठाण्यातील उपवन तलावात एक मुलगा बुडाला. आदित्य पवार असं या 17 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. तो ठाण्यातल्या लोकमान्य नगरात राहत होता. मित्रांबरोबर पोहण्यासाठी तो उपवन तलावात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला.  अखेर त्याचा मृतदेह हाती लागला. याठिकाणी पोहण्यासाठी बंदी घातलेली असतानाही काहीजण वारंवार तलावात उतरत असतात.  

पालघरमधील धबधब्यांवर तिघांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे चांगलेच प्रभावी झाले आहेत. या धबधब्यांवर सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून मागील दोन दिवसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील धबधब्यांवर मनाई आदेश सुरू असताना देखील काही अतिउत्साही पर्यटक थेट आपला जीव धोक्यात घालत फिरण्यासाठी येत आहेत. या धबधब्यांवर जीव रक्षकांची नेमणूक करून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. पर्यटन स्थळांवर लावण्यात आलेले सूचनाफलक आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करत आहेत. 

शेततळ्यात बुडून पर्यटकाचा मृत्यू

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे शेततळ्यात बुडून 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सागर म्हसू कांदे असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून तो नांदगावच्या जळगाव बुद्रुकचा रहिवाशीइ आहे. शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी मृतदेह थेट रस्त्यावर आणत गंगाधरी बायपास येथे रास्ता - रोको आंदोलन केले. सी.के.पाटील कृषी विद्यालयात हा विद्यार्थी शिकत होता. शिक्षकांनीच मासे काढायला पाठवल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.