प्रशांत परदेशी, धुळे : धुळे महापालिकेच्या ७४ जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या रणधुमाळीत भाजपाची हवा होती आता अंतर्गत लाथाड्यांमुळे गायब होताना दिसते आहे. याला निमित्त ठरलीय ती भाजप आमदार अनिल गोटे यांची नाराजी.
धुळ्याचे भाजपा आमदार अनिल गोटे यांची घुसमट होत असल्याचं आता समोर येत आहे. धुळे महापालिका निवडणूक प्रक्रियेत डावलल्याने नाराज झालेल्या गोटे यांनी अशाप्रकारे आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. धुळे पालिकेच्या या निवडणुकीसाठी भाजपमध्ये दोन गट पडल्याचं दिसतंय.
आमदार अनिल गोटे यांचं एक भाजप कार्यालय तर दुसरं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उदघाटन केलेलं दुसरं कार्यालय असं चित्र पाहायला मिळतंय. त्यातच पक्षात डावलल्यानं नाराज गोटे यांनी थेट प्रदेशाध्यक्ष दानवे याना आव्हान देत जाहीर सभेत राडा केला.
निवडणूक निर्णय प्रक्रियेत डावलल्यानं आणि गिरीश महाजनांकडे सगळी सुत्रे दिल्यानं गोटे नाराज झालेत. त्यांनी मग स्वतःलाच महापौरपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. यावेळी गोटे यांनी स्वकीयांवरच निशाणा साधलाय.
भाजपमधील हे वाद टोकाचे आहेत, यात समेट होण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचं चित्र दिसंतय. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आघाडी करून रणनीती आखलीय तर शिवसेनाही कामाला लागलीय. मात्र या आघाडी आणि सेनेतील प्रभावी इच्छुक भाजपाच्या गळाला लागत असल्याने या पक्षांची चांगलीच कोंडी झाली आहे.
धुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात समाज माध्यमातही राजकारण सुरु झालंय. कमरेखालची भाषा, गुंडाना उमेदवारी, गलिच्छ आरोप-प्रत्यारोप आणि खोट्या गुन्ह्यांची धमकी असे एक ना अनेक प्रकार धुळेकर येत्या महिनाभर अनुभवणार आहेत.