Auto News : जेव्हाजेव्हा संपूर्ण कुटुंबाला सामावून घेणाऱ्या कारचा मुद्दा असतो तेव्हातेव्हा भारतीयांकडून ठराविक ब्रँडच्या कारला पसंती दिली जाते. भारतीयांची पसंती आणि विश्वास मिळवणाऱ्या या ब्रँडच्या यादीत अनेकांचीच पसंती असणारं एक नाव म्हणजे महिंद्रा. दणकट आणि भल्याभक्कम कार, कमाल मायलेज आणि कारमधील समाधानकारक आसनक्षमता ही Mhindra च्या कारची खास वैशिष्ट्य.
कारप्रेमींमध्ये महिंद्राच्या स्कॉर्पिओ एन या वेरिएंटलाही कमाल पसंती मिळताना दिसते. कार खरेदीसाठी तुम्ही काही निकषांचा विचार करत असाल आणि कुटुंबातील प्रत्येकालाच सामावून घेणाऱ्या कारच्या शोधात असाल, तर ही कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. महिंद्रा स्कॉर्पिओच्या एन वेरिएंटचं पेट्रोल मॉडेल अनेकांच्याच खिशाला परवडणारं. बेस मॉडेल असल्यामुळं यात कंपनीनं अद्ययावत फिचर दिले नसले तरीही एका बेसिक वाहनामध्ये असणारे सर्वच फिचर तुम्हाला इथं मिळतात.
महिंद्राच्या स्कॉर्पिओ Z2 मॉडेलमध्ये 2.0L mHawk टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून, त्यातून 5000 RPM च्या क्षमतेनं 149.14 kW ची पॉवर आणि 1750-3000 RPM वर 370 Nm इतका पीक टॉर्क जनरेट होतो. या कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला जातो.
कारच्या इंटिरिअरमध्ये ब्लॅक फॅब्रिक सीट, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, 4-स्पीकर ऑडियो सिस्टम, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, इलेक्ट्रिक विंडो, सेंट्रल लॉकिंग, डुअल एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, ABS with EBD हे फिचर आहेत. तर, कारच्या एक्सटिरिअरमध्ये LED हेडलँप, LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRLs), 17-इंच स्टील व्हील्स, रिअर स्पॉयलर देण्यात आलं आहे.
महिंद्राची ही कार 7 प्रवासी आसनक्षमतेनं परिपूर्ण असल्यामुळं कुटुंबासाठी किफायतशीर दरात एखादी कार शोधत असाल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. ज्यासाठी तुम्हाला (एक्स शोरुम) ₹ 13.85 लाख इतकी किंमत मोजावी लागेल. कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, सनरूफ असे फिचर नसल्यामुळं काहींचा इथं हिरमोड होऊ शकतो. पण, भारतीय रस्ते, वातावरण आणि भारतीयांची वाहन चालवण्याची एकंदर शैली पाहता महिंद्राच्या Z4 किंवा Z6 या मॉडेलचा विचार करायला काहीच हरकत नाही.