पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा; म्हणाले, 'तुमचं पटत नसेल तर...'

Uddhav Thackery Criticise Ajit Pawar: वय झाल्याने शरद पवारांनी कुठेतरी थांबायला हवं, असं विधान अजित पवार यांनी जाहीर सभेत केल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी नोंदवलं मत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 27, 2023, 09:51 AM IST
पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरेंचा निशाणा; म्हणाले, 'तुमचं पटत नसेल तर...' title=
उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली टीका

Uddhav Thackery Criticise Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड करुन शिंदे सरकारला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. बंड केल्यानंतरच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत जाहीर सभेमधून विधान केलं होतं. पवारांचं वय झाल्याने त्यांनी कुठेतरी थांबायला हवं असं अजित पवारांनी म्हटलं होतं. याच विधानावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना सुनावलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

खासदार संजय राऊत यांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी अजित पवारांनी शरद पवारांना निवृत्त होण्यासंदर्भात दिलेल्या सल्ल्याबद्दल मतप्रदर्शन केलं. अजित पवारांनी केलेलं हे विधान अत्यंत वाईट आहे. आपण ज्यांच्याकडून सर्वाकाही घेतो त्याच्याबद्दल असे उद्गार काढणं हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. आपण नेहमीच वडीलधाऱ्यांना मान, सन्मान आणि आदर ठेवतो. ते ठेवलाच गेला पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचं वक्तव्य मला आवडलं नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

नक्की वाचा > मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...'

स्वार्थासाठी जातोय असं खरं सांगून जावं

तसेच पुढे बोलताना, 'तुमचं पटत नसेल तर जाहीरपणे सांगा की तुमचं पटत नाही. या वायातसुद्धा ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं त्यांना तुम्ही आता अशा पद्धतीने बोलणार हे मला पटलेलं नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. फक्त अजित पवाराच नाही कोणालाही त्यांच्या स्वार्थासाठी जायचं असल्यास त्यांनी स्वार्थासाठी जातोय असं खरं सांगून जावं. त्यामुळे कदाचित लोक त्यांना स्वीकारतील. सर्व काही मिळाल्यानंतर, जे जे शक्य होईल ते दिल्यानंतरही अन्याय झाला असं म्हणत टाहो फोडून जाणं बरोबर नाही. आमच्यातले सुद्धा गद्दार असतील किंवा सगळ्यात पक्षातील गद्दर असतील त्यांना हे लागू होतं,' असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

नक्की वाचा >> शिंदे गटाचे आमदार तुम्हाला भेटायला आले तर? उद्धव ठाकरे म्हणाले, 'माझ्याकडे येण्याची...'

त्या 2 भेटींवरही झाले व्यक्त

सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांची दोनदा भेट झाल्याच्या मुद्द्यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेनाप्रमुखांच्या मार्गाने चालणार आहे. त्यामुळे आमने-सामने करणाऱ्यांमधील मी आहे. जशास तसं उत्तर देणारा आहे मी. 'आरे'ला 'का'रे करण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळेच मी लढतोय. पवारसाहेबांची विचारसरणी वेगळी असेल आणि त्यानुसार ते जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.