उल्हासनगर : उल्हासनगरच्या महापौर पंचम कलानी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चांगल्याच अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण महापालिकेच्या भर महासभेतच महापौर पंचम कलानी यांनी मराठीद्वेष्टेपणा स्पष्टपणे दिसून आला. उल्हासनगर महापालिकेची महासभा मागील आठवड्यात पार पडली. या महासभेत शहरातल्या पाणीप्रश्नावरून रणकंदन सुरु होतं. त्यातच शिवसेनेचे नगरसेवक विजय पाटील यांनी मराठीत प्रश्न मांडायला सुरुवात केली. त्यावर महापौर पंचम कलानी यांनी त्यांना थांबवत आपल्याला मराठी येत नसून सिंधीत बोला, अशी सूचना केली. त्यावर विजय पाटील यांनी तुम्हाला सिंधीतही सांगितलं तरी कळत नाही असं प्रत्युत्तर दिलं.
महापौरांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या शहरात व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पंचम कलानी या माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांच्या सून आहेत. शहरात इतकी वर्षं वास्तव्य करून आणि शहरावर इतकी वर्षं सत्ता गाजवूनही त्यांना साधं मराठी येत नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.